राजकीय किस्से

राजकीय सभांचं व्यासपीठ

मुख्य प्रतिमा: संग्रहातील छायाचित्र किंवा दस्तऐवज · स्रोत आणि हक्कांची ओळ इथं.

तिरकसपणासाठी प्रसिद्ध असलेल्या पुणेकरांची भाषण आणि संभाषण कला हा मतमतांतरांचा विषय ठरू शकतो. परंतु हेच पुणेकर उत्तम श्रोतेही आहेत, याविषयी मतमतांतरं असू शकत नाहीत. शनिवारवाड्याची साक्ष घेऊन तर पाहा!

स्वातंत्र्योत्तर काळात हा शनिवारवाडा केवळ पुण्याच्याच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय विचारमंथनाचा केंद्रबिंदू झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा फुले मंडई आणि तिथल्या तत्कालीन मिनर्व्हा टॉकीजसमोरचं पटांगण हे पुण्यातील राजकीय सभास्थान होतं. परंतु १९४८नंतर तो मान शनिवारवाड्यासमोरच्या पटांगणाला मिळू लागला. वाढत्या पुण्यासाठीची ती मध्यवर्ती जागा तर होतीच; शिवाय आजच्यासारखं बांधकाम न झाल्यानं समोरचं पटांगण खुलं होतं. पटांगणाला सीमा घालणाऱ्या रस्त्यापलीकडेच नव्हे, तर चक्क छत्रपती शिवाजी महाराज पुलावर उभं राहूनही श्रोत्यांना सभा ऐकता येत असे. (तसे वक्ते, विषय आणि श्रोते असणाराही एक काळ होता!)

संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा हे शनिवारवाड्यानं प्रदीर्घ काळ पाहिलेलं राजकीय आंदोलन. मराठी भाषकांसाठी मुंबईसह स्वतंत्र राज्य व्हावं, या उद्देशानं या लढ्याला सुरुवात झाली. त्यासाठी ६ फेब्रुवारी १९५६ रोजी पुण्यात संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. त्याआधी आणि नंतरही या शनिवारवाड्याच्या पटांगणावर अनेक सभा दुमदुमल्या. आचार्य प्र.के. अत्रे, एस.एम. जोशी आदी नेत्यांची भाषणं मराठी जनमानसाच्या अंतःकरणाला स्पर्श करीत. याची परिणती १९६०च्या प्रारंभी संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीत झाली.

यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. परंतु दोनच वर्षांत त्यांना केंद्र सरकारमध्ये संरक्षणमंत्री म्हणून सन्मानानं पाचारण करण्यात आलं. त्यासाठीची सत्कार सभाही शनिवारवाड्यावरच झाली.

यानंतरही शनिवारवाडा हा स्थानिक प्रश्नांपासून देशपातळीवरील विषयांपर्यंत अनेक सामाजिक-राजकीय चर्चा-आंदोलनांच्या केंद्रस्थानी राहिला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आधी आणि नंतरही पुण्यात कार्यरत राहिलेल्या नागरी संघटनेच्या अनेक सभांना याच पटांगणानं व्यासपीठ दिलं. आणीबाणीपर्यंत या सभांचा तोच बहर कायम राहिला. भारतीय जनसंघाचे उमेदवार जगन्नाथराव जोशी यांच्या प्रचारार्थ अटलबिहारी वाजपेयी यांनी १९८४मध्ये घेतलेली सभा आणि पुणे जिल्ह्यातील शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांसाठी १९८९मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेली सभा ही याची ठळक उदाहरणं.

रेसकोर्स आणि हिराबागेचं मैदान हीदेखील त्या काळी अपवादात्मक सभांची ठिकाणं होती. १९५९मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू आणि १९७०मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधानपदी असताना त्यांच्या विराट सभा रेसकोर्सवर झाल्या होत्या. १९७०मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचीही हिराबागेच्या मैदानावर सभा झाली होती.

नव्वदच्या दशकानंतर मात्र या अलोट सभाही होईना झाल्या आणि शनिवारवाड्यासमोरचं पटांगणही वेगवेगळ्या कारणांसाठी आक्रसू लागलं. त्यानंतर या सभा टिळक चौक, सारसबागेसमोरची जागा, महाविद्यालयांची पटांगणं अशा ठिकाणी वळवल्या जाऊ लागल्या आणि शनिवारवाड्याच्या राजकीय व्यासपीठाची धग शांत झाली.