उद्योग, विज्ञान आणि तंत्रज्ञान: संलग्न संस्था

पुण्याच्या वाटचालीशी संलग्न ३९ संस्था, ३ विभागांत, स्थापनेच्या क्रमानं. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या आणि आजही कार्यरत संस्थांचा समावेश या यादीत केला आहे.

पुण्याच्या आर्थिक-औद्योगिक वाटचालीशी संलग्न संस्था १३

१८७८

दोराबजी अँड सन्स

कॅम्प भागात सोराबजी दोराबजी यांनी सुरू केलेलं हे पुण्यातलं सर्वांत जुनं आणि भारतातलं दुसरं जुनं पारशी रेस्टॉरंट आहे. सुरुवातीला चहा आणि बनमस्का विकणाऱ्या या दुकानात आज अस्सल पारशी जेवणासाठी गर्दी होते.

१८८५

डेक्कन पेपर मिल्स

पुण्याच्या जुन्या औद्योगिक इतिहासातलं हे महत्त्वाचं नाव आहे. भारतीय उद्योजकांनी काढलेली ही देशातली कागदाची पहिली गिरणी होती.

१९०६

कॉसमॉस सहकारी बँक

एक पतसंस्था म्हणून स्थापन झालेली, भारतातील ही सर्वांत जुन्या आणि अग्रगण्य सहकारी बँकांपैकी एक आहे. देशातल्या सात राज्यांत ती विस्तारली असून, तिच्या जवळपास दोनशे शाखा आहेत.

१९१०

वैद्य उपाहारगृह

कोकणातून पुण्यात आलेले रघुनाथ रामचंद्र वैद्य यांनी या उपाहारगृहाची सुरुवात केली. पुण्यात मिसळ विकायला सुरुवात करणारं हे पहिलं उपाहारगृह मानलं जातं.

१९१७

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

पुणे जिल्ह्यातल्या सहकार आणि ग्रामीण वित्तव्यवस्थेच्या विकासात या संस्थेचं दीर्घकाळ योगदान राहिलं आहे. आजदेखील ही बँक पुणे जिल्ह्यातल्या शेतकरी आणि सहकारी संस्थांचा आधारस्तंभ म्हणून सशक्तपणे कार्यरत आहे.

१९३२

बादशाही बोर्डिंग हाउस

टिळक रस्त्यावरच्या या खानावळीची सुरुवात १९३२मध्ये झाली. अस्सल, घरगुती आणि सात्त्विक महाराष्ट्रीय शाकाहारी थाळीसाठी हे ठिकाण आजही प्रसिद्ध आहे.

१९३४

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर

पुणे आणि परिसरातील उद्योग, व्यापार आणि व्यवसायांच्या विकासासाठी कार्य करणारं हे महत्त्वाचं संस्थात्मक व्यासपीठ आहे. पुणे परिसर जागतिक दर्जाचं औद्योगिक केंद्र बनवण्यासाठी भौतिक व सामाजिक पायाभूत सुविधा सुधारण्याकरिता चेंबर पाठपुरावा करतो.

१९३५

बँक ऑफ महाराष्ट्र

ही संस्था पुण्यात सुरू झाली आणि पुढे राष्ट्रीय स्तरावरची सार्वजनिक क्षेत्रातली बँक म्हणून विकसित झाली. स्थापना झाली तेव्हा मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रातील ती पहिली व्यावसायिक बँक होती.

१९३५

कॅफे गुडलक

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरात इराणी स्थलांतरित हुसेन अली यक्षी यांनी याची सुरुवात केली. आजही इथला बनमस्का आणि इराणी चहा यांचा आस्वाद घेण्यासाठी पुणेकर व पर्यटकांची सतत गर्दी असते.

१९४०

प्रभा विश्रांती गृह

नारायण पेठेत स्वातंत्र्यपूर्व काळात सरस्वतीबाई महादेव परांजपे यांनी सुरू केलेलं हे न्याहारी केंद्र आहे. इथं स्वातंत्र्यसैनिक गुप्त बैठकांसाठी जमून चर्चा करत. इथला बटाटेवडा आणि साबुदाणावडा आजही पुण्यात प्रसिद्ध आहेत.

१९४५

बजाज ऑटो

सुरुवातीला परदेशी वाहनांची आयात करणारी ही कंपनी १९५९मध्ये उत्पादन क्षेत्रात उतरली. राहुल बजाज यांच्या नेतृत्वाखाली स्कूटरच्या रूपात ती घरोघरी पोचली. सध्या ती जगातली चौथी मोठी दुचाकी व तीन चाकी वाहनांची उत्पादक कंपनी आहे.

१९४५

लक्ष्मीनारायण चिवडा

हरियाणातून पुण्यात आलेले लक्ष्मीनारायण दाता यांनी हातगाडीवर चिवडा व आइस्क्रीम विकून या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. आजही हा चिवडा त्याच्या खमंग, आंबटगोड आणि कुरकुरीत चवीमुळे प्रसिद्ध आहे.

१९४६

किर्लोस्कर ऑइल इंजिन्स

किर्लोस्कर समूहाची १८८८मध्ये स्थापना करणारे लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचे चिरंजीव उद्योगमहर्षी शंतनुराव किर्लोस्कर यांनी डिझेल इंजिनाच्या निर्मितीसाठी ही कंपनी स्थापन केली. सध्या ती डिझेल इंजिन आणि जनरेटर निर्मिती क्षेत्रात भारतातल्या आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे.

पुण्याच्या विज्ञान क्षेत्रातल्या वाटचालीशी संलग्न संस्था १०

१९१६

केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन केंद्र (सीडब्ल्यूपीआरएस)

मुंबई प्रांताचा ‘स्पेशल इरिगेशन सेल’ म्हणून या केंद्राची स्थापना झाली. जलसंपदा विकास, जलविद्युत प्रकल्प, पूरनियंत्रण, धरणं आणि सागरी बंदरांच्या संरचनेसाठी तांत्रिक सल्ला व मॉडेल-आधारित संशोधन पुरवणं हे या केंद्राचं कार्यक्षेत्र आहे.

१९२४

भारतीय हवामानशास्त्र विभाग

या विभागाची स्थापना १८७५मध्ये झाल्यानंतर सुरुवातीला त्याचं कार्यालय कोलकात्यात आणि नंतर सिमल्यात होतं. तिथून ते पुण्यात हलवल्यामुळे त्याला ‘सिमला ऑफिस’ असंही म्हटलं जातं. हवामानाचा अभ्यास व त्याआधारित अंदाज वर्तवण्याचं काम हे कार्यालय करतं.

१९४६

आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट

महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स म्हणून सुरू झालेल्या वैज्ञानिक संशोधनाच्या उपक्रमातून आघारकर संस्थेची निर्मिती झाली. वनस्पतिशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जनुकशास्त्र, कवकशास्त्र आणि नॅनो जैवतंत्रज्ञान या विषयांवर इथं संशोधन केलं जातं.

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल)

डॉ. रघुनाथ माशेलकर संचालक

आयुका

डॉ. जयंतराव नारळीकर संस्थापक

आयसर

भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था

आयआयटीएम

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था

राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र

सी-डॅक

डॉ. विजय भटकर संस्थापक-कार्यकारी संचालक; ‘परम’ महासंगणक

पुण्याच्या संरक्षण क्षेत्रातल्या वाटचालीशी संलग्न संस्था १६

१७७७

बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप

‘पायोनिअर लस्कर्स’ या नावानं या समूहाची स्थापना झाली. मात्र १८२०मध्ये त्यांचा सॅपर्स अँड मायनर्स म्हणून सैन्यात अधिकृत समावेश झाला. सैन्याला तांत्रिक व पायाभूत सुविधा पुरवणं हा या ग्रुपच्या स्थापनेचा मुख्य हेतू होता व आजही आहे.

१८६९

कमांड हॉस्पिटल, वानवडी

ब्रिटिश मिलिटरी हॉस्पिटल म्हणून याची सुरुवात झाली. आज हे भारतीय लष्कराचं सर्वांत मोठं आणि प्रमुख सुपर-स्पेशालिटी रुग्णालय आहे. १०५ एकरांवर ते विस्तारलेलं असून २०२१मध्ये इथं एक हजारांहून अधिक खाटांचं पर्यावरणपूरक संकुल उभारण्यात आलं आहे.

१८६९

दारूगोळा कारखाना, खडकी

भारतीय सशस्त्र दलांसाठी दारूगोळा आणि दारूगोळ्याचे घटक इथं तयार केले जातात. या कारखान्याची स्थापना ब्रिटिश काळात झाली असून तो देशाच्या सुरक्षा आणि संरक्षण स्वावलंबनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो.

१८९५

लष्कराचं दक्षिण विभाग मुख्यालय (सदर्न कमांड)

भारताच्या दक्षिण, पश्चिम आणि मध्य भागातील विशाल भूभागाचं, विस्तृत सागरी किनारपट्टीचं आणि राजस्थान व गुजरात सीमेवरील आंतरराष्ट्रीय सीमांचं रक्षण करण्यासाठी हा विभाग कार्यरत आहे.

१९०८

उच्च ऊर्जा पदार्थ विज्ञान प्रयोगशाळा (एचईएमआरएल)

नैनितालमध्ये ‘केमिकल एक्झामिनर्स ऑफिस’ नावानं स्थापन झालेली ही प्रयोगशाळा १९६०मध्ये पुण्यात स्थलांतरित करण्यात आली. संरक्षण दलांसाठीच्या उच्च ऊर्जा सामग्रीचं संशोधन तिथं केलं जातं.

१९१७

द क्वीन मेरीज टेक्निकल इन्स्टिट्यूट

मुंबईत स्थापन झालेली ही संस्था १९२२मध्ये खडकीत हलवण्यात आली. वैद्यकीय कारणांमुळे लष्करी सेवेतून अपात्र ठरणाऱ्या किंवा सेवा बजावताना अपंगत्त्व आलेल्या जवानांची शुश्रूषा व व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांचं सामाजिक पुनर्वसन इथं केलं जातं.

१९२३

आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंग

या संस्थेची स्थापना आर्मी स्कूल ऑफ फिजिकल ट्रेनिंग म्हणून झाली. संरक्षण दलांसाठी शारीरिक प्रशिक्षण उपक्रम राबवणं आणि क्रीडा प्रशिक्षक घडवणं हे या संस्थेचं मुख्य कार्य आहे.

१९३९

लोहगाव हवाई दल तळ

या तळाची स्थापना ब्रिटिश राजवटीत मुंबईला हवाई सुरक्षा पुरवण्याच्या उद्देशानं झाली. मे १९४७पासून तो भारतीय हवाई दलाच्या अखत्यारीत कार्यरत आहे. या तळाच्या पूर्वेला पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

१९४०

मिलिटरी हॉस्पिटल, खडकी

दुसऱ्या महायुद्धातल्या जखमींवर उपचार करण्यासाठी इंडो-बर्मा हॉस्पिटल नावानं याची स्थापना करण्यात आली. १३० एकरांहून विस्तीर्ण परिसरावरील या रुग्णालयात ८५०हून अधिक खाटांची सोय आहे.

१९४०

हाय एक्स्प्लोझिव्ह्ज फॅक्टरी, खडकी

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सैन्याला स्फोटकं व दारूगोळा पुरवण्यासाठी हा कारखाना सुरू झाला. आता इथं भारतीय सशस्त्र दलांसाठी उच्च दर्जाची लष्करी स्फोटकं, टीएनटी, औद्योगिक आम्ल आणि रॉकेट इंधनासाठी आवश्यक प्रोपेलंट्स तयार केले जातात.

१९४१

५१२, आर्मी बेस वर्कशॉप

लष्करी चिलखती वाहनं व दळणवळण साधनांच्या देखभालीसाठी ही कार्यशाळा स्थापन करण्यात आली. आजही ही कार्यशाळा जुन्या चिलखती वाहनांची पुनर्बांधणी करून देशाच्या संरक्षण आयातीवरील खर्चात मोठी बचत साधत आहे.

१९४२

आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ-थोरॅसिक सायन्सेस

हे सर्वसाधारण रुग्णालय १९७२पासून हृदयविकारांसाठीचं विशेष रुग्णालय म्हणून गोळीबार मैदानाजवळील सध्याच्या जागेतून कार्यरत आहे. हृदय आणि फुप्फुसांच्या क्लिष्ट आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया इथं होतात.

१९४३

कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग

मुळात राऊरकेलामध्ये स्थापन झालेली ही संस्था १९४८मध्ये दापोडीत स्थलांतरित करण्यात आली. भारतीय सैन्यदलांसाठीची ही तांत्रिक व सामरिक अभियांत्रिकी प्रशिक्षण संस्था आहे.

राष्ट्रीय संरक्षण अकादमी

पुण्यात आणण्यात काकासाहेब गाडगीळ यांचा मोलाचा वाटा

आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज

डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (डीआयएटी)