शिक्षण आणि क्रीडा: संलग्न संस्था

पुण्याच्या वाटचालीशी संलग्न ३१ संस्था, स्थापनेच्या क्रमानं. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या आणि आजही कार्यरत संस्थांचा समावेश या यादीत केला आहे.

पुण्याच्या क्रीडा क्षेत्रातल्या वाटचालीशी संलग्न संस्था ६

१८३०

पुणे रेसकोर्स

कॅम्प भागात ११८.५ एकरांच्या विस्तीर्ण क्षेत्रावर अश्वशर्यतींसाठीचं हे मैदान साकारलं आहे. याच्या देखभालीची आणि व्यवस्थापनाची जबाबदारी रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबकडे आहे. जुलै ते ऑक्टोबर या काळात इथं ‘पुणे डर्बी’सह घोड्यांच्या विविध शर्यती रंगतात.

१८८६

पूना क्लब

पूना जिमखाना म्हणून या क्लबची स्थापना झाली. हा भारतातल्या सर्वांत जुन्या आणि प्रतिष्ठित क्रीडा व सामाजिक क्लबपैकी एक आहे. भव्य जीवनशैली केंद्र म्हणून तो आता विकसित झाला आहे.

१९००

पीवायसी हिंदू जिमखाना

‘पूना यंग क्रिकेटर्स हिंदू जिमखाना’ म्हणून सुरू झालेल्या या संस्थेनं क्रिकेटसह विविध खेळांच्या विकासाला चालना दिली. क्लबमध्ये क्रिकेट मैदान, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बिलियर्ड्स रूम्स, टेनिस कोर्ट्स, स्क्वॉश कोर्ट्स, बॅडमिंटन हॉल आणि फिटनेस सेंटर उपलब्ध आहेत.

१९०६

डेक्कन जिमखाना

क्रिकेट, टेनिस, कुस्ती, जलतरण, ॲथलेटिक्स अशा विविध खेळांच्या प्रशिक्षणासाठी आणि प्रसारासाठी ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेत टेनिस, क्रिकेट, बॅडमिंटन, जलतरण, टेबल टेनिस आणि बास्केटबॉल यासारख्या खेळांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी आहेत.

१९२४

महाराष्ट्रीय मंडळ

तरुणांना शारीरिक शिक्षण व क्रीडा प्रशिक्षण देऊन सशस्त्र दलात प्रवेश मिळवण्यासाठी सक्षम बनवणं, हा स्थापनाकाळातील उद्देश होता. मंडळानं ‘चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय’ सुरू करून हजारो पदवीधर शारीरिक शिक्षक देशाला दिले आहेत.

१९४६

पीडीएमबीए क्रीडा संकुल

या संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाची लाकडी व सिंथेटिक बॅडमिंटन कोर्ट आधुनिक प्रकाशव्यवस्था आणि खेळाडूंसाठी व्यायामशाळा आहे. उदयोन्मुख खेळाडूंसाठी वर्षभर प्रशिक्षण शिबिरं, परदेशी प्रशिक्षकांचं मार्गदर्शन आणि स्पर्धांचं आयोजन इथं केलं जातं.

पुण्याच्या शैक्षणिक क्षेत्रातल्या वाटचालीशी संलग्न संस्था २५

१८२१

डेक्कन कॉलेज पोस्ट-ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट

मूळ ‘हिंदू कॉलेज’ म्हणून सुरू झालेल्या या संस्थेनं पुढे पुरातत्त्व, प्राचीन इतिहास, संस्कृत, भाषाविज्ञान आणि मानववंशशास्त्राच्या अभ्यास-संशोधनाची दीर्घ परंपरा निर्माण केली आहे. ही भारतातली तिसरी सर्वांत जुनी उच्च शिक्षण संस्था आहे.

१८५४

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ

हे भारतातलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वांत जुनं अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. महाराष्ट्र सरकारनं २०२२पासून त्याला स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा दिला आहे. स्टार्टअप प्रयोगशाळा आणि नोकरीच्या उत्तम संधी हे याचं वैशिष्ट्य आहे.

१८६०

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी

पूना नेटिव्ह इन्स्टिट्यूट नावानं सुरू झालेल्या या संस्थेचा आता शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयं, व्यावसायिक प्रशिक्षण संस्था आणि रुग्णालय असा विस्तार झाला आहे. ७५हून अधिक संस्थांमधून ती शहरी व ग्रामीण भागांत कार्यरत आहे.

१८६४

बिशप्स स्कूल

पुण्यातल्या ब्रिटिशांच्या लष्करी छावणीतील आणि अन्य अँग्लो-इंडियन मुलांसाठी ही शाळा सुरू झाली. कँप, कल्याणीनगर आणि उंड्री अशा तीन शाखांद्वारे ही संस्था कार्यरत असून, वसतिगृहाची व्यवस्था हे या शाळेच्या कॅप शाखेचं वैशिष्ट्य आहे.

१८६६

सेंट मेरीज स्कूल

ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी ही शाळा सुरू करण्यात आली. सुरुवातीला मुलींसाठी असलेल्या या शाळेत आता मुलींखेरीज मुलांचा स्वतंत्र विभाग आणि सह-शिक्षण देणारे कनिष्ठ महाविद्यालयही समाविष्ट आहे.

१८६७

सेंट व्हिन्सेंट हायस्कूल

सोसायटी ऑफ जेझुइट्स या कॅथॉलिक धार्मिक संस्थेनं अवघ्या पाच विद्यार्थ्यांसह, एका भाड्याच्या खोलीतून या शाळेची सुरुवात केली. आज या भव्य व आधुनिक सोयींनी संपन्न शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात २,७००हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

१८८०

न्यू इंग्लिश स्कूल

विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या पुढाकारातून

१८८४

डेक्कन एज्युकेशन सोसायटी

भारतीय तरुणांमध्ये राष्ट्रीय भावना, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आधुनिक ज्ञान निर्माण करून स्वस्त व दर्जेदार उच्च शिक्षण देणं हा स्थापनेमागील हेतू होता. ही संस्था आज महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील विविध शहरांमध्ये एकूण ५८ शैक्षणिक संस्था चालवते.

१८८४

महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी (हुजूरपागा)

मुलींसाठी आधुनिक शिक्षणाची सुरुवात करणाऱ्या पुण्यातल्या अग्रगण्य संस्थांपैकी ही एक आहे. स्त्रीशिक्षणाच्या प्रसारात तिचं ऐतिहासिक योगदान आहे. १८ विद्यार्थिनींपासून सुरू झालेल्या या संस्थेत आता उच्च शिक्षणापर्यंतच्या विद्याशाखा उपलब्ध आहेत.

१८८५

कॅम्प एज्युकेशन सोसायटी

सर्वसामान्य वर्गातल्या, विशेषतः पुण्याच्या पूर्व भागातल्या मुलांना परवडणाऱ्या खर्चात दर्जेदार शिक्षण देण्यासाठी ही संस्था स्थापन झाली. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयं, पदवी आणि व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्थांच्या रूपात आज तिचा विस्तार झाला आहे.

१८८५

फर्ग्युसन कॉलेज

वामन शिवराम आपटे पहिले प्राचार्य; रँग्लर परांजपे वीस वर्षांहून अधिक काळ प्राचार्य

१८८८

शिक्षण प्रसारक मंडळी

तत्कालीन ब्रिटिश सरकारची आर्थिक मदत न घेता मराठी भाषेतून व स्वदेशी विचारातून पाश्चात्त्य शिक्षण देण्याच्या उद्देशानं ही संस्था सुरू करण्यात आली. आज ही संस्था पुणे, मुंबई, सोलापूर, चिपळूण, नागोठणे आणि बंगळुरू अशा विविध ठिकाणी सुमारे ४० शैक्षणिक संस्था चालवते.

१८९६

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था

पुण्यातील महिला शिक्षणाच्या व्यापक चळवळीला संस्थात्मक आधार देणारी ही प्रमुख संस्था आहे. आज या संस्थेच्या पुणे, सातारा, वाई, रत्नागिरी, नागपूर, कामशेत आणि वसई यांसारख्या विविध ठिकाणी ७५हून अधिक शाखा कार्यरत आहेत.

१९०७

कृषि महाविद्यालय

महात्मा जोतीराव फुले यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ब्रिटिश राजवटीनं पुण्याच्या विज्ञान महाविद्यालयाची (आजचं सीओईपी विद्यापीठ) शेतकी शाखा १८७९मध्ये सुरू केली आणि त्याचंच या महाविद्यालयात रूपांतर झालं. देशाच्या शेतीविकासाला शिक्षण व संशोधनातून हातभार लागावा, हा स्थापनेमागील हेतू होता.

१९०९

अनाथ विद्यार्थी गृह

वंचित आणि अनाथ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ही संस्था स्थापन झाली. आज ती पुणे विद्यार्थी गृह या नावानं अभियांत्रिकी, संगणकविज्ञान, मुद्रण तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रांत शिक्षण प्रदान करते.

१९१५

स्पायसर ॲडव्हेंटिस्ट युनिव्हर्सिटी

कोइमतूर व लखनौमध्ये शाळांच्या स्वरूपात सुरुवात करणाऱ्या संस्थेनं १९३७मध्ये त्याला कनिष्ठ महाविद्यालयाची जोड दिली. १९४२मध्ये ते पुण्यात स्थलांतरित होऊन स्पायसर मिलिटरी कॉलेज झालं. २०१४पासून त्याला विद्यापीठाचा दर्जा मिळाला आहे.

१९१६

एस.पी. कॉलेज

प्रा. दि.ब. देवधर इथं प्राध्यापक

१९१६

एसएनडीटी महिला विद्यापीठ

महिलांसाठी उच्च शिक्षणाची स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याच्या महर्षी कर्वे यांच्या प्रयत्नांतून हे विद्यापीठ सुरू झालं. हे भारतातलंच नव्हे, तर संपूर्ण दक्षिण आशियातलं महिलांसाठीचं पहिलं विद्यापीठ आहे.

१९१७

अखिल भारतीय श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी

ऱाजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या संकल्पनेतून या संस्थेची स्थापना झाली. सुरुवातीला लष्करी आणि प्राथमिक शिक्षणावर भर देणाऱ्या या संस्थेनं आता उच्च आणि तंत्र शिक्षणाच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे.

१९१८

श्री शिवाजी मराठा सोसायटी

बहुजन समाजातल्या मुलांना दर्जेदार शिक्षण देऊन त्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशानं या संस्थेची स्थापना करण्यात आली. ही संस्था पुण्यात पूर्वप्राथमिक ते पदव्युत्तर स्तरापर्यंत वीसपेक्षा जास्त शाळा, महाविद्यालयं आणि वसतिगृहं चालवते.

१९३०

गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था

अर्थशास्त्रातलं उच्च शिक्षण आणि संशोधन यांसाठी स्थापन झालेलं हे महत्त्वाचं केंद्र असून, त्याला आता अभिमत विद्यापीठाचा दर्जा आहे. अर्थशास्त्र, लोकसंख्याशास्त्र आणि विकास आराखड्यांच्या संशोधनात या संस्थेचं योगदान मोलाचं आहे.

१९३२

नौरोसजी वाडिया महाविद्यालय

पुण्याच्या पूर्व भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं मॉडर्न एज्युकेशन सोसायटीनं या संस्थेची पायाभरणी केली. जगभरातील २५हून अधिक देशांतले विद्यार्थी शिक्षण घेत असल्यामुळे इथलं वातावरण बहुसांस्कृतिक बनलं आहे.

१९३४

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी

आधुनिक व पुरोगामी शिक्षण देण्याच्या हेतूनं कै. शंकरराव कानिटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही संस्था स्थापन केली. पुणे शहर व जिल्ह्यामध्ये या सोसायटीच्या ५०हून अधिक संस्था व शाखा कार्यरत आहेत.

१९३८

कुस्रो वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी

पुण्यातल्या या अग्रगण्य तंत्रनिकेतनाची स्थापना मॉडर्न एज्युकेशन सोसायटीनं केली. ही एक स्वायत्त संस्था असून इथं सुसज्ज प्रयोगशाळा, ग्रंथालय आणि उत्तम कॅम्पस अशा आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.

१९४९

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

तत्कालीन पुणे विद्यापीठ; उच्च शिक्षण, संशोधन आणि व्यावसायिक शिक्षणाला नवं अधिष्ठान