समाज आणि संस्कृती: संलग्न संस्था
पुण्याच्या वाटचालीशी संलग्न १९ संस्था, २ विभागांत, स्थापनेच्या क्रमानं. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या आणि आजही कार्यरत संस्थांचा समावेश या यादीत केला आहे.
पुण्याच्या सामाजिक वाटचालीशी संलग्न संस्था ११
पुणे नगर वाचन मंदिर
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख आदी विचारवंतांच्या पुढाकारानं स्थापन झालेलं हे महाराष्ट्रातल्या सर्वांत जुन्या सार्वजनिक ग्रंथालयांपैकी एक आहे. या वारसा वास्तूत लाखो दुर्मिळ ग्रंथ, ऐतिहासिक संदर्भ पुस्तकं, मासिकं आणि हस्तलिखितं जतन केली गेली आहेत.
डेव्हिड ससून इन्फर्म असायलम (निवारा वृद्धाश्रम)
ही पुण्यातील सर्वांत जुन्या सामाजिक संस्थांपैकी एक आहे. सुरुवातीला अनाथ, अपंग आणि गरजू लोकांसाठी सुरू झालेल्या या संस्थेचं नाव स्वातंत्र्यानंतर ‘निवारा वृद्धाश्रम’ करण्यात आलं. आजही ती वृद्धांच्या सेवेत कार्यरत आहे.
पुणे प्रार्थना समाज
धार्मिक आणि आध्यात्मिक सुधारणांसाठी ही संस्था स्थापन करण्यात आली. हिंदूंमधील मूर्तिपूजा आणि रूढीप्रियता यांच्या विरोधात जागृती करण्याचा स्थापनेमागील हेतू होता. आजही ही संस्था विविध धार्मिक, आध्यात्मिक व सामाजिक उपक्रम राबवते.
येरवडा मध्यवर्ती कारागृह
हे महाराष्ट्रातील सर्वांत मोठं कारागृह असून, महात्मा गांधी यांच्यासह अनेक स्वातंत्र्यसैनिकांना ब्रिटिश राजवटीनं तिथं कैदेत ठेवल्यामुळे त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. पाचशे एकरांवर उभारलेल्या या कारागृहाची कैदीक्षमता साधारणतः अडीच हजार आहे.
शारदा सदन
पंडिता रमाबाई यांनी मुंबईत स्थापन केलेली ही संस्था पुढच्याच वर्षीपासून पुण्यातून कार्यरत झाली. विधवा आणि निराधार स्त्रियांना आश्रय देणं आणि त्यांना आत्मनिर्भर बनवणं हे या संस्थेचं वैशिष्ट्य होतं. पंडिता रमाबाई मुक्ती मिशनच्या रूपात हे कार्य आजही सुरू आहे.
पुणे सेवासदन सोसायटी
रमाबाई रानडे आणि गोपाळ कृष्ण देवधर यांनी या संस्थेची स्थापना केली. वंचित महिलांच्या पुनरुत्थानाचा स्थापनेमागील उद्देश होता. महिलांचं शिक्षण, प्रशिक्षण, निवारा आणि सक्षमीकरण यांसाठी ती कार्यरत राहिली आहे.
श्री पूना गुजराती बंधू समाज
पुण्यातील गुजराती समुदायात गुजराती भाषा व संस्कृतीचा प्रसार आणि परस्परसहयोग वृद्धिंगत करण्यासाठी या संस्थेची स्थापना झाली. समाजासाठी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व आरोग्यविषयक उपक्रमांचं आयोजन ही संस्था करते.
प्रादेशिक मनोरुग्णालय, येरवडा
ब्रिटिश काळात सुरू झालेलं हे रुग्णालय आशिया खंडातल्या सर्वांत मोठ्या मानसिक रुग्णालयांपैकी एक म्हणून ओळखलं जातं. हे रुग्णालय सुमारे १३८ एकर परिसरावर पसरलं आहे. याची २,४०० रुग्णक्षमता आहे.
सदार वल्लभभाई पटेल कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल
कॅन्टोन्मेंट परिसरातले नागरिक आणि लष्करी कर्मचारी यांच्या कुटुंबीयांना आरोग्य सेवा देण्यासाठी या रुग्णालयाची स्थापना करण्यात आली. हे शंभर खाटांचं सरकारी रुग्णालय पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाद्वारे संचालित केलं जातं.
द पूना स्कूल अँड होम फॉर द ब्लाइंड
दृष्टिहीन मुला-मुलींच्या पुनर्वसनासाठी डॉ. एस. आर. माचवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही संस्था सुरू केली. ही संस्था दृष्टिहीनांना मोफत ब्रेल लिपीतलं शिक्षण, राहण्याची सोय आणि त्यांचं जीवन सुसह्य व्हावं म्हणून प्रशिक्षण देते.
महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समिती
महाराष्ट्रात हिंदी भाषा व साहित्य यांच्या प्रचार-प्रसारासाठी या समितीची स्थापना करण्यात आली. हिंदी परीक्षांचं आयोजन, पुस्तकांचं संपादन व दुर्मिळ ग्रंथांचं डिजिटायझेशन आणि प्रबोधन व प्रचाराच्या स्पर्धा व कार्यक्रम ही समिती आयोजित करते.
पुण्याच्या सांस्कृतिक वाटचालीशी संलग्न संस्था ८
वक्तृत्वोत्तेजक सभा
न्या. महादेव गोविंद रानडे यांनी हे व्यासपीठ स्थापन केलं. दरवर्षी आयोजित केली जाणारी वसंत व्याख्यानमाला हे या संस्थेचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य आहे. व्याख्यानांद्वारे जनजागृती करणं आणि वैचारिक देवघेवीचा ‘वसंत’ फुलवण्याचं काम ही संस्था आजही करते.
वेदशास्त्रोत्तेजक सभा
न्या. महादेव गोविंद रानडे आणि कविवर्य महादेव मोरेश्वर कुंटे यांनी या संस्थेची स्थापना केली. प्राचीन भारतीय वेद, शास्त्रं आणि संस्कृत भाषेच्या अध्ययन-अध्यापन परंपरेचं रक्षण आणि संवर्धन करणं हे या संस्थेचं मुख्य स्वरूप आहे.
वेद पाठशाळा
ही एक पारंपरिक गुरुकुल पद्धतीची निवासी शाळा आहे. प्राचीन भारतीय वेदविद्या आणि संस्कृतीचं जतन करणं हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. काळाच्या पाऊलखुणा ओळखून पाठशाळेनं संगणक, इंग्रजी, गणित आणि विज्ञान यांसारखे विषयही समाविष्ट केले आहेत.
भारत नाट्य मंदिर
पुण्यातली नाट्यकला आणि सांस्कृतिक उपक्रमांना संस्थात्मक व्यासपीठ देणाऱ्या पुण्यातील आरंभीच्या संस्थांपैकी ही एक आहे. नव्या कलाकारांना घडवणाऱ्या परंपरेचं आणि पुण्याच्या सांस्कृतिक अस्मितेचं हे व्यासपीठ जिवंत प्रतीक मानलं जातं.
महाराष्ट्र साहित्य परिषद
मराठी भाषा आणि साहित्य यांच्या प्रसारासाठी कार्य करणारी ही साहित्यसंस्था आहे. मराठी साहित्याचा प्रसार करणं, नवोदित लेखकांना प्रोत्साहन देणं आणि साहित्यिक कार्यक्रमांचं आयोजन करणं ही परिषदेची मुख्य उद्दिष्टं आहेत.
पुणे भारत गायन समाज
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी कार्य करणारी ही महत्त्वाची संस्था आहे. थोर संगीतज्ञ पंडित भास्करबुवा बखले यांनी हिची स्थापना केली. गायन-वादनाच्या शास्त्रोक्त प्रशिक्षणाबरोबरच इथं संगीताचे महाराष्ट्र सरकार मान्यताप्राप्त अभ्यासक्रमही चालवले जातात.
टिळक स्मारक मंदिर
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ टिळक रस्त्यावर उभारलेल्या या ऐतिहासिक वास्तूमध्ये सुसज्ज नाट्यगृह, संदर्भ ग्रंथालय आणि कलादालन आहे. वसंत व्याख्यानमालेच्या आयोजनाचंही हे दीर्घकाळ केंद्र राहिलं आहे.
पूना गेस्ट हाउस
नानासाहेब सरपोतदार यांनी याची स्थापना केली. लौकिकार्थानं उपाहारगृह असलं, तरी मराठी चित्रपट व नाट्य कलावंतांचा हक्काचा आधार आणि त्यांच्या निवास व निर्वाहाची सोय करणारं ठिकाण म्हणून पूना गेस्ट हाउसनं मराठी सांस्कृतिक विश्वात आपुलकीचं स्थान प्रस्थापित केलं आहे.