सांस्कृतिक किस्से
पुणेरी मराठीच प्रमाण का?
मुख्य प्रतिमा: संग्रहातील छायाचित्र किंवा दस्तऐवज · स्रोत आणि हक्कांची ओळ इथं.
पुणेरी भाषा हीच प्रमाण मराठी भाषा का मानली जाते, हा प्रश्न बंडखोर मानावा की व्यवहार्य, हे तुम्ही भाषक सीमारेषांच्या कुठल्या बाजूला उभे राहून बोलत आहात, त्यावर अवलंबून म्हणता येईल. परंतु या प्रश्नाचं उत्तर काळाच्या पोटात आणि कोशांच्या अंतरंगांत दडलेलं आहे.
मराठी भाषेला संत ज्ञानेश्वर माउली आणि संत तुकाराम महाराज यांनी वेगळीच आध्यात्मिक उंची प्राप्त करून दिली असली, तरी त्यांच्या कार्यकाळांमधल्या सुमारे तीन शतकांत मराठी भाषेची स्थिती फारशी ऊर्जित नव्हती. त्यातच दरम्यानच्या कालखंडातील परकी आक्रमकांच्या सत्तेमुळे मराठीवर फारसी भाषेचा प्रभाव वाढत गेला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या राजकीय पत्रव्यवहारातही तो राहिला; परंतु विशेष म्हणजे आपला खासगी पत्रव्यवहार त्यांनी या प्रभावापासून दूर ठेवला.
पुढे पेशव्यांचा कार्यकाळ सुरू होईपर्यंत फारसीचा प्रभाव कमी होत जाऊन मराठी भाषा अधिक मोकळी झाली. सत्ताकेंद्र पुण्यात आल्यामुळे पुण्याची मराठी भाषा आपसुकच प्रसार पावत गेली.
परंतु, मराठीला पुणेरी साज चढण्यामागचं खरं कारण पेशव्यांच्या कालखंडानंतरचं आहे. तत्कालीन मुंबई प्रांताची सूत्रं माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांच्याकडे असताना त्यानं सार्वत्रिक शिक्षणाचा उपक्रम हाती घेऊन इंग्रजी पुस्तकांची भाषांतरं सुरू केली. तेव्हा प्रथम पुणेरी मराठीची प्रमाण म्हणून निवड केली गेली. त्यानंतर १८२९मध्ये जेम्स थॉमस मोल्सवर्थ यांच्या देखरेखीखाली इंग्रजी-मराठी कोशाचं काम झालं, तेव्हा त्यांनीही पुण्यात प्रचलित असलेली भाषाच प्रमाण मानली. त्याचं कारण त्यांनी कोशाच्या प्रस्तावनेतच स्पष्ट केलं, ते असं : “देशभाषांच्या वर्तनाचा असा नियम आहे, की स्वदेशाचे मध्यभागी शुद्ध स्वरूपाने असावे आणि उत्तरोत्तर पर्यन्तभागी तत्तद्देशान्तरस्थ भाषांचे मिश्रणाने संकीर्ण रूपाने असावे. महाराष्ट्र देशाचा मध्यभाग म्हटला असता प्रायः पुणे प्रांत होतो. अत एव पुणे प्रांती जे शब्द प्रसिद्ध आहेत ते प्रायः सर्व महाराष्ट्रदेशभर प्रसिद्ध असे समजून ते शब्द प्रांतांचे खुणेवाचून लिहिले आहेत.” याच सुमाराला तयार करण्यात आलेल्या अन्य दोन व्याकरणकोशांतही असाच उल्लेख आहे.
इतिहास व भाषा संशोधक अ.का. प्रियोळकर यांनी मात्र याच संदर्भात वेगळं मत व्यक्त केलं आहे. “पेशवाईच्या पूर्वी पुण्यात आजची पुणेरी बोली बोलली जात नव्हती. पुण्याला राजकीय महत्त्व आल्यानंतर तिथं ब्राह्मणांची अधिक वस्ती झाली आणि ब्राह्मणांची बोली पसरली. पुण्याच्या राजकीय महत्त्वामुळे पुढे तिथल्या बोलीला प्रमाण स्वरूप प्राप्त झालं. पुढे इंग्रजी अंमल सुरू झाल्यावर मुंबई शहर महाराष्ट्राचं केंद्र बनलं. मराठी गद्याचा इंग्रजी अवतार मुंबईत सुरू झाला. दादोबा पांडुरंग, मेजर कँडी वगैरे लोकांनी आपल्या शालेय पुस्तकांनी संस्कार केलेली आजची जी ग्रांथिक मराठी आहे, तीच आज इतर भागांतील सुशिक्षित लोकांप्रमाणे पुणे जिल्ह्यातही बोलली जाते. ती आज बोलण्यात आपण आणलेली असली तरी ती कृत्रिम अशी बोली आहे. तिच्या निर्मितीला सबंध महाराष्ट्रातील लोकांचा हातभार लागलेला आहे. म्हणून ती केवळ देशी नसून मराठी आहे; बोली नसून भाषा आहे.”