सांस्कृतिक किस्से
निवडुंग्या आणि पालखी विठ्ठल
मुख्य प्रतिमा: संग्रहातील छायाचित्र किंवा दस्तऐवज · स्रोत आणि हक्कांची ओळ इथं.
पुण्याच्या पुण्याईत न्हाऊन जायचं असेल तर दरवर्षी आषाढात या शहरात दोन दिवस मुक्कामी येणारी पंढरीची वारी अनुभवायलाच हवी!
पावसाळा सुरू होऊन गावोगावच्या पेरण्या सुरू झाल्याच्या बातम्या कानांवर पडू लागतात, तोवर ही वारीची लगबग सुरू होते अन् पुण्याच्या रस्त्यांना एक वेगळीच लय प्राप्त होऊ लागते. टाळ-मृदंगांचा नाद, ओठी अभंग आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोष करणाऱ्या वारकऱ्यांना सोबत देताना शहरातील दगडी रस्तेही जणू भक्तिरसात डोलू लागतात. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुण्यात दाखल होतात आणि पुणे अक्षरशः ‘प्रतिपंढरपूर’ बनतं.
या पालखी सोहळ्यातील मुक्कामाच्या ठिकाणांनाही या वारीप्रमाणेच समृद्ध इतिहास लाभला आहे. त्यांपैकी एक म्हणजे भवानी पेठेतलं पालखी विठोबा मंदिर. संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचा मुक्काम इथं होतो. या मंदिराला अठराव्या शतकापासूनचा इतिहास आहे. तुकाराम महाराजांचे टाळकरी रामेश्वर भट्ट यांचा वावर या परिसरात असल्याच्या खुणा आजही सांगितल्या जातात. त्यांचे समकालीन सूफी संत अनगडशाह यांचा दर्गाही या मंदिरापासून जवळ आहे. तुकाराम महाराजांचं सासरही याच परिसरातलं आहे. त्यांची कीर्तनंही या मंदिरात होत, असं मंदिराचे विश्वस्त सांगतात.
संत तुकाराम महाराजांच्या पालखी मुक्कामाचं ठिकाण म्हणजे नाना पेठेतलं निवडुंगा (निवडुंग्या) विठोबा मंदिर. या मूर्तीला आठशे वर्षांचा इतिहास असल्याचं मंदिराचे विश्वस्त सांगतात. आज हा परिसर दाट वस्तीचा झाला असला, तरी एकेकाळी इथं निवडुंगांचं रान होतं. त्या निवडुंगांतच विठ्ठलाची मूर्ती सापडल्याची आख्यायिका सांगितली जाते. म्हणूनच या देवाला निवडुंग्या विठोबा हे नाव लाभलं. पुण्यात आल्यानंतर सुरुवातीला दोन्ही पालख्यांचा मुक्काम या मंदिरात असे. पुढे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम इथं कायम राहिला, तर संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचा मुक्काम पालखी विठोबा मंदिरात होऊ लागला.
सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी मंदिरालाही ‘प्रतिपंढरपूर’ म्हणून ओळखलं जातं. पंढरपूरची वारी करणं अशक्य झालेले संभाजीबुवा गोसावी यांनी हे मंदिर उभारलं. या मंदिराच्या देखभालीसाठी छत्रपती शाहू महाराजांनी जमीन इनाम दिल्याचं सनदपत्र मंदिरात लावलेलं आढळतं. त्यावरून या मंदिराचं बांधकाम इ.स. १७३२पूर्वी झाल्याचं लक्षात येतं. इ.स. १७३२मध्ये निजामानं पुण्यावर हल्ला करून भरपूर नासधूस केली होती, त्यात या मंदिराचंही नुकसान झालं होतं. त्यानंतर थोरले माधवराव पेशवे यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला होता.