सांस्कृतिक किस्से
सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ
मुख्य प्रतिमा: संग्रहातील छायाचित्र किंवा दस्तऐवज · स्रोत आणि हक्कांची ओळ इथं.
गणेशोत्सव हा पुण्याच्या सांस्कृतिक जीवनातला मानबिंदू आणि त्याचं सार्वजनिक रूप हे या धार्मिक-सांस्कृतिक आविष्कारातून प्रबोधन साधण्यासाठीची चळवळ.
या गणेशोत्सवाची सुरुवात कशी झाली?
पुण्यात पेशवेकाळातही गणेशोत्सव साजरा केला जात असे. परंतु तो शनिवारवाड्यातल्या गणेश महालामध्ये खासगी स्वरूपात होत असे. १७९२मध्ये उत्तर पेशवाईचं वैभव कळसाला पोचलेलं असताना, इंग्रज चित्रकार वेल्सनं पाहिलेल्या या सोहळ्याचं नकाशारूपी चित्र तयार केलं होतं. ते त्यानं रोजनिशीमध्ये काढलेलं होतं. ती रोजनिशी इंग्लंडच्या येल विद्यापीठातल्या संग्रहालयामध्ये आहे.
हा उत्सव पाच दिवस चालत असे. उत्सवकाळात कलाकार, गायक आणि नर्तक या दरबारात आपली कला सादर करत आणि त्यांना पेशव्यांकडून रोख व वस्तू स्वरूपात मानधन दिलं जाई.
कसबा पेठेतल्या सरदार मुजुमदार वाड्यातही इ.स. १७१४पासून गणेशोत्सव साजरा केला जातो.
परंतु, या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप येण्यास एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध उजाडला. त्याला निमित्त ठरलं ते सरदार कृष्णाजी काशीनाथ खाजगीवाले यांच्या ग्वाल्हेर भेटीचं. त्यांनी तिथं पाहिलेल्या गणेशोत्सवाच्या धर्तीवर पुण्यातही उत्सव सुरू करावा, अशी कल्पना आपले मित्र भाऊसाहेब रंगारी यांच्यापुढे मांडली. भाऊसाहेबांचं मूळचं आडनाव जावळे. शनिवारवाड्याच्या पिछाडीला असणाऱ्या शालूकर बोळात ते राहत. रंग देण्याच्या व्यवसायामुळे ते रंगारी म्हणूनच प्रसिद्ध होते. भाऊसाहेबांनी १८९२मध्ये उत्सवाची कल्पना साकारण्याचं पक्कं केलं. भाऊसाहेबांनी आपल्या राहत्या वाड्यात आपल्या सहकाऱ्यांची एक बैठक बोलावली. या बैठकीला महर्षि अण्णासाहेब पटवर्धन, बाळासाहेब नातू, गणपतराव घोटावडेकर, लखूशेठ दंताळे, बळवंत नारायण सातव, खंडोबा तरवडे, मामा हसबनीस, दगडूशेठ हलवाई, नानासाहेब पटवर्धन आदी उपस्थित होते. राक्षसावर प्रहार करणाऱ्या सशस्त्र गणेशाची मूर्ती त्यांनी साकारली. त्यासाठी लाकडी भुसा आणि कागदाचा लगदा वापरला. त्या वर्षी भाऊसाहेबांबरोबरच नानासाहेब खाजगीवाले आणि गणपतराव घोटावडेकर यांनीही सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना केली.
लोकमान्य टिळकांना या उपक्रमातील लोकजागृतीची ताकद लवकरच लक्षात आली. त्यांनी १८९३मध्ये ‘केसरी’तील अग्रलेखातून त्याचं कौतुक केलं. या उत्सवातून समाजाला एकत्र आणण्याची आणि राष्ट्रीय विचार जनमानसात पोचवण्याची विलक्षण क्षमता पाहून त्यांनी उत्सवाला व्यापक स्वरूप देण्याचा निर्णय घेतला आणि तो महाराष्ट्रभर पोचवला. त्यासाठी १८९४मध्ये त्यांनी सदाशिव पेठेतल्या सरदार विंचुरकर वाड्यात गणेशोत्सव सुरू केला. केवळ दोन वर्षांत सार्वजनिक गणेशोत्सवांची संख्या शंभरावर गेली. त्यामुळे गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा न राहता सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय जागृतीचा उत्सव बनला.