ऐतिहासिक किस्से

शिवछत्रपतींचा जगातला पहिला अश्वारूढ पुतळा

मुख्य प्रतिमा: संग्रहातील छायाचित्र किंवा दस्तऐवज · स्रोत आणि हक्कांची ओळ इथं.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला पहिला अश्वारूढ पुतळा पुण्यात उभारण्यात आला आणि सुमारे शंभर वर्षं तो त्याच दिमाखात पुणेकरांना प्रेरणा देत आहे, हे तुम्हाला माहिती आहे?

हा पुतळा आहे श्री शिवाजी प्रीपरेटरी मिलिटरी स्कूलमध्ये. त्याचा इतिहास रंजक आहे. राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांनी १९१७मध्ये पुण्यात शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. त्यासाठी ऑल इंडिया शिवाजी मेमोरिअल सोसायटी स्थापनही झाली. १९२१मध्ये स्मारकाचं भूमिपूजनही झालं; परंतु दुर्दैवानं १९२२मध्ये शाहू महाराजांचं निधन झालं. त्यानंतर स्मारकाचं रेंगाळलेलं काम राजाराम महाराजांनी हाती घेतलं.

शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं काम प्रथम रावबहादूर म्हात्रे यांना, तर स्मारकातील चार शिल्पं (पॅनेल) करण्याचं काम नानासाहेब करमरकर यांना देण्यात आलं. नंतर पुतळ्याचं कामही करमरकरांवर सोपवण्यात आलं. साडेतेरा फूट उंच, तेरा फूट लांब आणि साडेतीन फूट रुंद अश्वारूढ पुतळा तयार करायचा होता. त्यासाठी राजाराम महाराजांच्या मुंबईतील बंगल्यात साठ फूट उंच क्रेन बसवता येईल आणि अख्खा ट्रक आत जाईल इतका मोठा स्टुडिओ उभारण्यात आला. करमरकरांनी शिवचरित्राचा आणि शिवाजी महाराजांच्या चित्रांचा अभ्यास केला. घोड्याच्या अभ्यासासाठी राजाराम महाराजांनी त्यांचा शहानवाझ नावाचा अरबी घोडा आणून दिला. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करमरकरांनी पुतळ्याचं तीन फूट उंचीचं छोटं मॉडेल तयार केलं. ते सर्वांना पसंत पडल्यानंतर मातीचं मोठं मॉडेल आणि प्लास्टर मोल्डिंग-कास्टिंगचं काम झालं. प्रत्यक्षात पुतळा ब्राँझचा होता. हा पुतळा एकसंध कास्ट करण्याचं आव्हान करमरकरांनी स्वीकारलं. त्यासाठी १० ते १२ टन धातूचा रस एकदम तयार करता येईल आणि ३० ते ४० टन वजन उचलू शकेल अशी फाउंड्री आवश्यक होती. तेव्हा हे असं काम भारतात झालं नव्हतं. माझगाव गोदीमधील ‘मेकेगॉन अँड मॅकेंझी’नं हे आव्हान स्वीकारलं. हे अग्निदिव्य पार पडलं आणि शिवाजी महाराजांचा देखणा पुतळा तयार झाला.

मुंबईहून तो पुण्याला आणणं हेही अवघड काम होतं, कारण रेल्वेचा सर्वांत कमी उंचीचा बोगदा साडेनऊ फूट उंचीचा होता आणि पुतळ्याची उंची साडेतेरा फूट. शेवटी रेल्वे ट्रॉलीची उंची कमी करून, बोगद्यातून नेताना पुतळा तिरपा करण्याची युक्ती सुचवण्यात आली. अशा अनेक अडचणींवर मात करून शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा एसएसपीएमएसच्या आवारात दिमाखात उभा राहिला. तत्कालीन बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर लेस्ली विल्सन यांनी १६ जून १९२८ रोजी त्याचं अनावरण केलं होतं.