ऐतिहासिक किस्से

थेऊरजवळ आद्य वसाहत

मुख्य प्रतिमा: संग्रहातील छायाचित्र किंवा दस्तऐवज · स्रोत आणि हक्कांची ओळ इथं.

पुणे या नावाचा महिमा आणि इतिहास जेवढा प्राचीन, त्यापेक्षा या परिसरातील लोकवस्तीचा इतिहास प्राचीन आहे... आणि त्याचे धागेदोरे पुण्याच्या मध्यवस्तीतून किंवा पेठांमधून न मिळता आजच्या विस्तारित शहराच्याही हद्दीबाहेर आढळले आहेत!

आज आपण सर्व जण कलियुग अनुभवत असलो, तरी या पुण्यानं त्याआधीची युगंही अनुभवली आहेत. आज ज्या जागी डेक्कन कॉलेज आहे, त्या परिसरात मुळा-मुठेच्या संगमाजवळ बांधकाम करताना लाख-दीड लाख वर्षांपूर्वीची अश्मयुगीन हत्यारं आढळली आहेत. अशा आणखी काही पुराव्यांच्या आधारे मध्याश्मयुगात, म्हणजे इ.स.पू. दहा हजार ते इ.स.पू. चार हजार या काळात पुण्याच्या परिसरात मानवी वावर होता, असं पुरातत्त्व संशोधक म्हणतात.

यानंतर आले ते नवाष्मयुग आणि त्यानंतर ताम्रपाषाणयुग. या ताम्रपाषाणयुगात तर पुण्याच्या परिसरात मानवी वावराच्याच नव्हे, तर चक्क वसाहतीच्याही खुणा संशोधकांना आढळल्या आहेत. या दोन्ही युगांच्या उंबरठ्यावर महाराष्ट्रात स्थिर जीवनाची सुरुवात झाली, ती साधारण साडेचार हजार वर्षांपूर्वी, तापीच्या खोऱ्यातून. तिथून पुढे साऱ्या महाराष्ट्रात या आद्य शेतकऱ्यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या. पुण्याच्या परिसरात इ.स.पू. चौदाशेच्या सुमारास सर्वप्रथम अशी वसाहत झाली. ती होती सध्याच्या थेऊरमध्ये, मुठा नदीच्या उजव्या तीरावर. परंतु, इ.स.पू. एक हजारच्या सुमारास वारंवार दुष्काळ पडू लागल्यानं या शेतकऱ्यांच्या वसाहती उजाड झाल्या. ही दैन्यावस्था पुऱ्या महाराष्ट्रातच पाच शतकांहून अधिक काळ टिकली.

इ.स.पू. पाचशे ते इ.स. पाचशे या काळात मात्र महाराष्ट्रातील हवामान अत्यंत अनुकूल होतं. लोहयुग अवतरलं होतं आणि त्यामुळे लोखंडी अवजारांच्या साह्यानं काळ्या मातीची मशागत चांगली करता येऊ लागली होती. शेती हा फायदेशीर व्यवसाय झाला होता. एवढा, की या सुमारास शेतकरी पुण्याच्या आसपास असलेल्या बौद्ध विहारांना सढळ हातानं दान देऊ लागले होते.

सातवाहन काळात भारतातून माल भरलेली जहाजं मोठ्या प्रमाणावर रोमला जाऊ लागली. त्यामुळे रोमन सोन्याच्या नाण्यांचा ओघ भारतात सुरू झाला. या व्यापारानिमित्तानं रोमन व्यापारी पुण्याच्या जवळपास धेनुकाकट या नगरीत येऊन राहिले होते. हे धेनुकाकट सातवाहनकालीन प्राचीन व्यापारी केंद्र आणि बौद्ध लेण्यांशी संबंधित ठिकाण होतं. हे ठिकाण पुणे जिल्ह्यातल्या मावळ भागात, लोणावळ्याजवळ असणाऱ्या कार्ले लेणी परिसरात वसलेलं होतं.

परंतु, लहरी हवामानाचा फटका शेतकऱ्यांना आजच्यापेक्षा तेव्हा अधिकच बसत असे. एवढा, की त्यांना तो प्रदेशच सोडून जावं लागत असे. तशीच अवस्था पुणे परिसरावर तिसऱ्या शतकाच्या मध्याला आली होती आणि मग आठव्या शतकापूर्वीपर्यंत टिकली होती. त्यानंतर पुन्हा हवामान थोडं अनुकूल झालं आणि तिथपासून तेराव्या शतकापर्यंत टिकलं. याच काळात खुद्द आजच्या पुण्यात प्रथम वस्ती झाल्याचे पुरावे मिळतात.