सांस्कृतिक किस्से

गोसावींची करणी... तळघरात पाणी

कालखंड: नोंद नाही सांस्कृतिक वाटचाल
अक्षर

मुख्य प्रतिमा: संग्रहातील छायाचित्र किंवा दस्तऐवज · स्रोत आणि हक्कांची ओळ इथं.

आजकाल कुठं तळघरात पाणी साठत असेल तर तो बांधकामांच्या गुणवत्तेविषयी शंका घेण्याचा आणि नगररचनेमधल्या त्रुटीचा विषय ठरतो. परंतु अठराव्या शतकात बांधलेल्या आणि पावसाचं किंवा वाहतं पाणी जाण्याला कुठूनही मार्ग नसलेल्या एखाद्या मंदिराच्या तळघरात आजही पाणी आढळतं, यावर तुमचा विश्वास बसेल?

पुण्याच्या सोमवार पेठेतल्या, नागझरी ओढ्याच्या काठावरच्या त्रिशुंड मयूरेश्वर गणपती मंदिराचं दर्शन घ्यायला जाल, तेव्हा हा वास्तुविशेषही समजून घ्यायला हवा. आपल्या अद्भुत वास्तुकलेसाठी आणि वैशिष्ट्यपूर्ण रचनेसाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे. इ.स. १७५४ ते १७७० या दरम्यान इंदूरचे गणपतगिरी आणि भीमगिरी गोसावी यांनी या मंदिराची निर्मिती केली.

मंदिराचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथली श्री गणेशाची मूर्ती. इथं गणपती बाप्पा एका मोरावर स्वार असून, त्यांना तीन सोंडा आणि सहा हात आहेत, म्हणूनच या मंदिराला त्रिशुंड गणपती म्हटलं जातं. मंदिराच्या बाहेरील भिंतींवर केलेल्या कोरीव कामात ब्रिटिश सैनिक गेंड्याला साखळदंडानं बांधताना दाखवलं आहे. मंदिर बांधकामाच्या सुमारास झालेल्या प्लासीच्या लढाईचे संदर्भ यातून डोकावतात. राजस्थान आणि माळवा स्थापत्यशैलींचा प्रभाव असलेल्या या मंदिराचं बांधकाम काळ्या पाषाणात अत्यंत कलाकुसरीनं केलं गेलं आहे.

या मंदिराचं सर्वांत रंजक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या गर्भगृहाच्या खाली असलेलं तळघर. या तळघरात गणपतगिरी गोसावी महाराजांची समाधी आहे. या तळघराची रचना अशी आहे, की तिथं वर्षभर नेहमी पाणी असतं. मंदिरातल्या गणेशमूर्तीच्या बरोबर खाली तळघरात हे समाधिस्थान आहे. श्री गणेशाच्या पूजेदरम्यान रोज केल्या जाणाऱ्या अभिषेकाचं जल या समाधीपर्यंतही पोचावं, अशी व्यवस्था (छिद्रे) या मूर्तीमध्ये आहे. अभ्यासकांच्या मते, मंदिराच्या बाजूनं वाहणाऱ्या प्राचीन नागझरी ओढ्यामुळे किंवा जमिनीखालील पाण्याच्या नैसर्गिक झऱ्यांमुळेही या तळघरात पाणी झिरपत असावं. परंतु, हे पाणी तिथं ठरावीक पातळीवरच साचून राहतं.

हे तळघर वर्षभर सर्वसामान्य भाविकांसाठी पूर्णपणे बंद असतं. मात्र, दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी ते भाविकांना दर्शनासाठी खुलं केलं जातं. या दिवशी हजारो भाविक तळघरातल्या गुडघाभर पाण्यातून वाट काढत गोसावी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतात.