सांस्कृतिक किस्से

पुणेकरांचे लाडके देव

कालखंड: नोंद नाही सांस्कृतिक वाटचाल
अक्षर

मुख्य प्रतिमा: संग्रहातील छायाचित्र किंवा दस्तऐवज · स्रोत आणि हक्कांची ओळ इथं.

नावं ठेवण्यात पुणेकरांचा हात कुणी धरू नये, असा खोचक आणि काहीसा सावध सल्ला आपणही कधीतरी ऐकला असेल. परंतु, प्रत्येक वेळी पुणेकर काही तिरकसपणानं किंवा तुसडेपणातूनच नावं ठेवतात, असा कुणाचा समज असेल, तर आत्ताच तो दूर करा. पुणेकरांमध्येही प्रेम, आस्था आणि श्रद्धा आहे आणि त्याची साक्ष चक्क पुण्यातले देव आणि त्यांची मंदिरंच देऊ शकतात!

अजूनही पटत नसेल, तर पुण्यातल्या मारुती, गणपती आणि विठ्ठल मंदिरांची ही नावंच जाणून घ्या. काही नावं त्या काळच्या समाजजीवनाचे दाखले देणारी, काही भक्तिरसात बुडवणारी, तर काही चमत्कृतींकडे निर्देश करणारी.

कोणे एकेकाळी शनिवारवाड्यासमोर बटाट्याचा बाजार भरायचा म्हणून तिथला देव तो बटाट्या मारुती, सराफ बाजाराच्या सान्निध्यामुळे रविवार पेठेतला तो सोन्या मारुती, तर पेशव्यांच्या उंटांच्या काफिल्यापाशी असलेला तो रास्ता पेठेतला उंटाड्या मारुती! हलवायांच्या दुकानांमुळे रोज जिलब्यांची माळ गळ्यात पडणारा तो शुक्रवार पेठेतला जिलब्या मारुती, अंत्ययात्रा विसाव्यासाठी थांबायची तिथला सदाशिव पेठेतला विसावा मारुती, तर शनिवारवाड्यालगतच्या ज्या भागात भांग विकली जात असे त्या परिसरातला तो भांग्या मारुती. नारायण पेठेतल्या पुजाऱ्यांनी देवाला पत्र्याचं छप्पर आणून घातलेला पत्र्या मारुती आणि चापेकर बंधूंनी गोफण क्लब सुरू केला तो बुधवार चौकाजवळचा गोफण्या मारुती झाला.

या नावांमध्ये इतिहास आणि श्रद्धा कशी एकवटली होती, याचं उत्तम उदाहरण म्हणजे नाना पेठेतला डुल्या मारुती. पानिपतच्या युद्धात मराठ्यांची पीछेहाट झाल्याचं ऐकून ही मूर्ती दुःखानं थरथर कापली आणि डोलू लागली असं म्हणतात; म्हणून तो डुल्या मारुती झाला. तर दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी पुणे सोडावं की नाही, यासाठी लावलेल्या कौलाला मान डोलवून संमती देणारा तो हाच डुल्या मारुती!

मारुतीप्रमाणेच विठ्ठलाची नावंही पुणेकरांच्या भक्तीची वेगळीच कहाणी सांगतात. नाना पेठेत निवडुंगाच्या फडात सापडलेली मूर्ती म्हणजे निवडुंग्या विठोबा, तर शनिवार पेठेतल्या भक्तांच्या उपवास पाळण्याच्या परंपरेतून आलेलं नाव म्हणजे उपाशी विठोबा मंदिर. बुधवार पेठेतल्या कापड बाजारात त्या काळी ज्या कापडाला सर्वाधिक मागणी असे त्या पासोडी कापडावरून तिथल्या मारुतीला आणि पुढं विठ्ठलालाही दिलं गेलेलं नाव म्हणजे पासोड्या विठोबा.

नारायण पेठेत मुळात श्रीपाद मंदिर म्हणून ओळख असलेल्या मंदिराची प्रतिष्ठापना करणाऱ्यांच्या दाढीची ओळख जोडली गेली ते दाढीवाला दत्त मंदिर आणि विजय टॉकीजजवळील मंदिराला नवस फेडण्यासाठी लाकडी सोटे वाहिले जायचे म्हणून तो सोट्या म्हसोबा.

विष्णूचं लग्न लक्ष्मीशी झालं असतानाही पुण्यात एक बीजवर विष्णू (दुसरं लग्न झालेला) आहे. कारण जुनी लक्ष्मीची मूर्ती भग्न झाल्यावर तिथं दुसरी मूर्ती बसवली गेली! सदाशिव पेठेत गद्रे सावकारांनी बांधलेल्या मुरलीधर मंदिरापाशी इंग्रज आणि अरब सैनिकांमध्ये झालेल्या रक्ताळलेल्या लढाईमुळे आणि फितूर द्रविड बंधूंच्या खुनामुळे त्याला नाव मिळालं ते खुन्या मुरलीधर.

थोडक्यात सांगायचं, तर पुण्यातली ही चमत्कारिक वाटणारी नावं प्रत्यक्षात त्या-त्या देवांना आपल्याच घरातला एक सदस्य मानण्याच्या पुणेरी लडिवाळपणाची आणि अथांग श्रद्धेची एक अनोखी पावती आहे.