ऐतिहासिक किस्से
भाऊ महाराज बोळ
मुख्य प्रतिमा: संग्रहातील छायाचित्र किंवा दस्तऐवज · स्रोत आणि हक्कांची ओळ इथं.
पुण्याच्या मध्यवस्तीतून फिरताना लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता किंवा टिळक रस्ता सहज नजरेस पडतात; पण हे सर्व प्रमुख रस्ते तुलनेनं अलीकडचे आहेत. त्याआधीचं पुणे हे वाड्यांचं, पेठांचं आणि अरुंद बोळांचं शहर होतं. त्या जुन्या पुण्याची ओळख आजही जपणाऱ्या मोजक्या रस्त्यांपैकी एक म्हणजे भाऊ महाराज बोळ.
तुळशीबागेपासून बाजीराव रस्त्याला समांतर जाणारा हा अरुंद बोळ गेली दोनशे वर्षं जवळजवळ त्याच नावानं ओळखला जातो. परिसर बदलला, वाड्यांच्या जागी इमारती उभ्या राहिल्या, निवासी भागात दुकानं आणि व्यावसायिक आस्थापना वाढल्या; पण या बोळानं आपली ऐतिहासिक ओळख मात्र टिकवून ठेवली.
या नावामागे आहेत भाऊ महाराज पंडित. पेशवाईच्या उत्तरार्धात आणि इंग्रजी अमलाच्या सुरुवातीच्या काळात त्यांचं नाव पुण्यातील मान्यवरांमध्ये आवर्जून घेतलं जाई. त्यांचे वडील सिद्धेश्वर महाराज पंडित हे कोल्हापूरचे छत्रपती यांचे राजगुरू होते. त्यांना ‘महाराज पंडित’ ही मानाची उपाधी बहाल करण्यात आली होती. भाऊ महाराजांचा प्रशस्त वाडा या बोळात असल्यामुळे पुढे संपूर्ण रस्ताच त्यांच्या नावानं ओळखला जाऊ लागला.
या बोळाखाली आणखी एक ऐतिहासिक ठेवा दडलेला आहे. नानासाहेब पेशवे यांनी उभारलेल्या प्रसिद्ध कात्रज जलवाहिनीचा एक दगडी नळ याच मार्गानं जात असे. भाऊ महाराजांच्या वाड्यात आणि जवळील लकडखाना परिसरात त्या पाण्याचे हौद होते. आज जनता सहकारी बँकेजवळचा परिसर पूर्वी ‘लकडखाना’ म्हणून ओळखला जाई; कारण तिथं लाकडाच्या मोठ्या वखारी होत्या. काळाच्या ओघात हे नावच विस्मृतीत गेलं.
संशोधकांच्या मते, जुन्या आंबिल ओढ्याचा प्रवाह साधारण याच मार्गानं वाहत असे. एकोणिसाव्या शतकापर्यंत हा परिसर तत्कालीन पुण्याच्या हद्दीवर होता.
आज शेवडे बोळ या रस्त्याला येऊन मिळतो; पण शंभर वर्षांपूर्वी हे दोन्ही मार्ग जोडलेले नव्हते. विसाव्या शतकाच्या प्रारंभी नगरपालिकेनं काही वाडे आणि खासगी जागा संपादित करून हा जोडरस्ता तयार केला.
पुण्याच्या इतिहासातल्या अनेक पानांचे धागे आजही या बोळ संस्कृतीत जपून ठेवले गेले आहेत.