राजकीय किस्से
वसंत सिनेमात गांधीजी
मुख्य प्रतिमा: संग्रहातील छायाचित्र किंवा दस्तऐवज · स्रोत आणि हक्कांची ओळ इथं.
एकेकाळी पुण्यातली चित्रपट आणि नाट्य गृहं हीदेखील काही गाजलेल्या व्याख्यानांसाठीची व्यासपीठं होती, हे कधी तुमच्या कानावर पडले होते? नाही ना? मग, अशाच एका नाट्यगृहात चक्क महात्मा गांधी यांचं व्याख्यान झालं होतं, हे तर तुम्ही ऐकलं असेल, अशी शक्यताच नाही.
...तर झालं असं होतं, की ९ जानेवारी १९१५ रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतील आपलं वास्तव्य आणि वकिली पेशा सोडून भारतात परतले होते. गोपाळ कृष्ण गोखले हे गांधीजींचे राजकीय गुरू. गांधीजींनी भारतात येऊन ब्रिटिशांच्या पारतंत्र्याच्या जोखडाखाली हा देश कोणत्या यातनांतून जात आहे हे पाहावं आणि त्यापासून मुक्ततेसाठीच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी व्हावं, असं आवाहन गोखले यांनी केलं होतं. त्याला गांधीजींनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. ९ जानेवारी १९१५ रोजी गांधीजी भारतात परतले आणि दुर्दैवानं त्याच्या पुढच्याच महिन्यात गोखल्यांचं निधन झालं.
गांधीजींनी अद्याप स्वातंत्र्यलढ्याची किंवा त्या लढ्यात अग्रणी राहिलेल्या काँग्रेसची सूत्रं ताब्यात घेतली नव्हती, असा तो काळ होता. परंतु डेक्कन सभा या संस्थेनं १९ फेब्रुवारी १९१६ रोजी त्यांचं किर्लोस्कर नाट्य मंदिरात व्याख्यान आयोजित केलं. हे नाट्य मंदिर म्हणजे आत्ताचा वसंत सिनेमा. १९०९मध्ये ते सुरू झालं होतं आणि दीनानाथ मंगेशकर, बालगंधर्व अशा दिग्गजांची संगीत नाटकं तिथं गाजत. तर अशा त्या नाट्यगृहात व्याख्यान देण्यासाठी डेक्कन सभेचं निमंत्रण गांधीजींनी स्वीकारण्यामागे खास कारण होतं. ते म्हणजे खुद्द गोपाळ कृष्ण गोखले यांनी महादेव गोविंद रानडे यांच्या सोबतीनं ही संस्था स्थापन केली होती. पुणे सार्वजनिक सभा या तेव्हाच्या पुण्यातल्या अग्रगण्य राजकीय-सामाजिक व्यासपीठ असणाऱ्या संस्थेशी मतभेद होऊन या दोघांनी ही नवी संस्था उभारली होती. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सहभाग, दख्खन प्रदेशातल्या राजकीय व सामाजिक सुधारणांना चालना देणं आणि लोकजागृती ही या संस्थेची मुख्य उद्दिष्टं होती.
गांधीजींच्या त्या ऐतिहासिक सभेचं वैशिष्ट्य म्हणजे, पुणे शहरातल्या जनसभांच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व जाती-धर्मांचे लोक त्यानिमित्तानं एका छताखाली एकत्र आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. र.पु. (रँग्लर) परांजपे होते आणि मंचावर महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांच्या डिप्रेस्ड क्लासेस मिशनचे विद्यार्थीही उपस्थित होते.
शनिवारवाड्याकडून मंडईच्या दिशेनं छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरून जाताना नाना वाड्याच्या शेजारी उजव्या बाजूला वसंत सिनेमा हे नाव आजही दुकानांच्या भाऊगर्दीतून डोकावताना दिसतं. नाट्यगृह ते एकपडदा चित्रपटगृह आणि भव्य एकपडदा चित्रपटगृह ते एका व्यापारी संकुलातील छोटेखानी चित्रपटगृह असा त्याचा दोनदा कायापालट झाला आहे. परंतु गांधीजींचा चरणस्पर्श हा त्याला भारताच्या राजकीय इतिहासाशी आणि स्वातंत्र्यलढ्याशी कायमचा जोडणारा ठरला आहे.