ऐतिहासिक किस्से

तळ्यातला गणपती

मुख्य प्रतिमा: संग्रहातील छायाचित्र किंवा दस्तऐवज · स्रोत आणि हक्कांची ओळ इथं.

आजच्या सारसबागेचं स्वरूप पेशवेकाळापेक्षा पूर्णतः वेगळं आणि आटोपशीर असलं, तरी त्याकाळी ही बाग पर्वती तलावाचा एक भाग होती. ओढ्याचा प्रवाह वळवल्यानंतर, भविष्यातील पाण्याची गरज ओळखून पेशव्यांनी पर्वतीच्या पायथ्याशी सुमारे २५ एकर क्षेत्रावर एक कृत्रिम तलाव खोदला होता. हाच तो ऐतिहासिक तलाव, ज्याच्या मधोमध आजची सारसबाग आणि सणस मैदान उभं आहे. तलाव खोदताना तिथं अनेक नैसर्गिक झरे लागल्यानं त्यात वर्षभर पाण्याचा मोठा साठा उपलब्ध असे. तलाव खोदताना पेशव्यांनी त्याच्या मध्यभागी सुमारे २५,००० चौरस फुटांचं एक कृत्रिम बेट राखून ठेवून त्यावर एक सुंदर बाग विकसित केली.

श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी १७८४मध्ये पर्वती मंदिराच्या पायथ्याशी तेव्हा असलेल्या तलावाच्या मध्यभागी हे मंदिर उभारलं. भोवतालच्या तळ्यात सारस पक्षी सोडण्यात आल्यामुळे या जागेला सारसबाग हे नाव पडलं. सुरुवातीला चारही बाजूंनी पाण्यानं वेढलेलं असल्यामुळे याला ‘तळ्यातला गणपती’ म्हणून ओळखलं जात असे.

मराठी साम्राज्याचा अस्त होऊन १८१८मध्ये पेशवाई संपुष्टात आल्यानंतर, ब्रिटिश राजवटीत या तलावाच्या देखभालीकडे कालांतरानं दुर्लक्ष झालं. १८४२पर्यंत देवस्थानांची व्यवस्था पेशवाई पद्धतीनुसारच सुरू होती; परंतु १८६१मध्ये इंग्रज सरकारनं तलावातल्या बेटाची जागा श्री देवदेवेश्वर संस्थानाकडे ठेवून उर्वरित जागा पुणे नगरपालिकेकडे हस्तांतरित केली. या काळात तलावात गाळ व पाण्याचं डबकं साचल्यानं डासांचा प्रादुर्भाव वाढून शहराच्या आरोग्याला धोका निर्माण झाला. परिणामी, नगरपालिकेनं हा तलाव कचरा आणि राडारोडा टाकून बुजवला. एकेकाळी टिळक रस्त्यापर्यंत पसरलेला हा जलाशय बुजवून तिथं सध्याचं मैदान आणि बाग निर्माण करण्यात आली, मात्र बेटावरील मंदिराचं अस्तित्व कायम राहिलं.