सामाजिक किस्से

पुण्याचा ईस्ट-वेस्ट रोड

कालखंड: नोंद नाही सामाजिक वाटचाल
अक्षर

मुख्य प्रतिमा: संग्रहातील छायाचित्र किंवा दस्तऐवज · स्रोत आणि हक्कांची ओळ इथं.

तुम्हाला पुण्याचा ईस्ट-वेस्ट रोड माहितीये? कालच तर तुम्ही त्या रस्त्यावरून गेला असाल. हं, पण आता त्याचं नाव वेगळं आहे. लक्ष्मी रस्ता म्हणून त्याची ओळख केव्हाच प्रस्थापित झाली आहे.

या रस्त्याला पार्श्वभूमी आहे ती एकोणिसाव्या शतकातल्या पुण्यात होत गेलेल्या स्थित्यंतराची. १८१८मध्ये पेशवाईचा अस्त झाल्यानंतर पुण्याच्या मध्यवर्ती भागातल्या व्यापारात मोठी मंदी आली होती आणि अनेक व्यापारी पुणे सोडून जात होते. दुसरीकडे, इंग्रजांनी लक्ष दिलेल्या लष्कर (कॅन्टोन्मेंट) भागात वस्ती आणि पाश्चात्त्य धाटणीची बाजारपेठ वाढत होती. १८८०च्या सुमारास डेक्कन जिमखान्याकडचा पुण्याचा पश्चिम भागही वाढू लागला होता, तिथं शैक्षणिक संस्था आणि उच्चभ्रूंच्या वसाहती उभ्या राहत होत्या. अशा वेळी, या दोन भिन्न संस्कृतींमध्ये मिलाफ घडवून आणण्यासाठी पूर्व-पश्चिम दळणवळणाची प्राथमिक गरज निर्माण झाली. यातूनच १९०८मध्ये तत्कालीन पुणे नगरपालिकेनं ईस्ट-वेस्ट रोडची कल्पना मांडली.

ही योजना कागदावर यायला १९१४ साल उजाडलं. पण दाट लोकवस्ती आणि जुने वाडे पाडून रस्ता तयार करणं सोपं नव्हतं. जागामालकांना पटवणं आणि भरपाई देण्याच्या प्रदीर्घ प्रक्रियेमुळे १९२०पर्यंत या कामानं गती घेतली नाही. तोवर या भागात विजय टॉकीज ते सोट्या म्हसोबा आणि हुजूरपागेजवळ असे दोन बोळ होते. अखेर १९२१मध्ये रस्त्याच्या कामानं वेग घेतला आणि एक खडीचा रस्ता आकाराला येऊ लागला. लक्ष्मी रस्ता असं त्याला नाव दिलं गेलं. धूळ उडू नये म्हणून या रस्त्यावर सतत पाणी मारावं लागे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना खांबांवर कंदील लावलेले असत आणि चांदण्याच्या प्रकाशानुसार कंदिलांतलं तेल कमी-जास्त करून ते रोज संध्याकाळी पेटवले जात!

सोट्या म्हसोबा मंदिर ही त्या काळी या भागातली ठळक ओळख होती. पूर्वी हे मंदिर आजच्या रस्त्याच्या अगदी मध्यभागी होतं आणि तोवर अस्तित्वात असलेला रस्ताही याच नावानं ओळखला जाई. नवस पूर्ण झाल्यावर देवाला लाकडी सोटे वाहण्याच्या प्रथेमुळे या रक्षक देवाला हे नाव मिळालं होतं. रस्त्याच्या कामासाठी हे मंदिर रस्त्याकडेला पुनःप्रतिष्ठित केलं गेलं. आजही उंबऱ्या गणपती चौकाजवळ, लकडी पुलाच्या दिशेनं जाताना डाव्या बाजूला हे मंदिर आहे.

या रस्त्यासाठी जागा ताब्यात घेणं आणि काम पूर्णत्वाला नेणं ही प्रक्रिया एवढी किचकट होती, की १९३२मध्ये त्याचा एकदा फेरविचारही झाला होता. परंतु तोवर पूर्वेकडून बेलबाग चौकापर्यंतचं काम पूर्ण झालं होतं आणि रस्त्यावर आलेल्या कापड दुकानदारांना त्याचा फायदा मिळू लागला होता. त्यामुळे हा फेरविचार करणं बाजूला ठेवून लकडी पुलापर्यंतचं काम नेटानं मार्गी लावण्यास सुरुवात झाली. १९२०पासून सुरू झालेलं हे काम अखेरीस १९५४मध्ये पूर्णत्वास आलं. १९५४च्या गॅझेटिअरमध्ये त्याची नोंद ३२ फूट रुंद रस्ता आणि १८ फूट रुंद पदपथ अशी आहे.

या रस्त्याला ऐतिहासिक परिमाण मिळालं ते १९५२मध्ये, जेव्हापासून पुण्याची वैभवशाली सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक अधिकृतपणे याच लक्ष्मी रस्त्यावरून मार्गस्थ होऊ लागली.

पूर्वेची संस्कृती आणि पश्चिमेची आधुनिकता यांचा मिलाफ साधणारं शहर म्हणून पुण्याची ओळख आहे. परंतु याच पुण्याच्या पूर्व आणि पश्चिम भागांना सांधणारा दुवा म्हणून एकेकाळी लक्ष्मी रस्ता बांधण्यात आला होता हे सांगितलं, तर आता नवल वाटेल. एका शतकाच्या प्रवासात या रस्त्यानं हा मिलाफ तर साधला आहेच; त्याचबरोबर पुणेकरांच्या हक्काचं खरेदीचं ठिकाण आणि एक मॉलसदृश बाजारपेठ म्हणून लौकिकही प्रस्थापित केला आहे.