सामाजिक किस्से

चहाच्या पेल्यांतून वादळ

मुख्य प्रतिमा: संग्रहातील छायाचित्र किंवा दस्तऐवज · स्रोत आणि हक्कांची ओळ इथं.

इरसालपणा हेदेखील पुणेरी व्यक्तिमत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणावं का? असेलही कदाचित. किमान, गोपाळराव जोशी या पत्रकारानं एका शतकापूर्वी केलेली ही पोलखोल आणि त्यातून तेव्हाच्या पुण्याच्या सामाजिक पटलावर उडलेला धुरळा पाहता, तसं म्हणता येईल.

टपाल कार्यालयातली नोकरी हे गोपाळरावांचं उदरनिर्वाहाचं साधन. पण फावल्या वेळेत ते पत्रकारिताही करत. त्यांनी केलेल्या बातमीदारीचा एक किस्सा आजही भारतीय पत्रकारितेच्या सुरुवातीच्या दिवसांतलं स्टिंग ऑपरेशन म्हणून गाजतो, असे ते करामती होते.

झालं असं होतं, की शुक्रवार पेठेतल्या पंचहौद मिशननं सेंट मेरीज कॉन्व्हेंटमध्ये एक समारंभ आयोजित केला होता. मिशनरी लोकांनी न्या. महादेव गोविंद रानडे यांच्यासह ४० ते ५० सुधारकांना त्यासाठी आमंत्रित केलं होतं. त्यांपैकी काहींनी तिथं निबंध वाचले, भाषणं केली. त्यानंतर मिशनमधल्या सिस्टरनी या मंडळींसाठी चहा आणला. यांपैकी काहींनी चहाचा पेला हातात घेतला व तसाच ठेवून दिला, तर काहींनी चहा पिऊन टाकला. गोपाळरावांनी ‘पुणे वैभव’ या तत्कालीन सनातन्यांच्या वर्तमानपत्रात त्याची बातमी उपस्थितांच्या नावांनिशी दिली. “आजकालचे सुधारक शेफारले आहेत,” असा तिचा आशय होता.

“या सुधारकांनी गोर्‍या मडमांच्या लुसलुशीत हातांनी आपल्या हातात आलेला चहा पिऊन मिटक्या मारत ते आपापल्या घरी निघून गेले,” ही गोष्ट तत्कालीन पुणेकरांनाही रुचली नाही.

कळस असा घडला, की बातमी प्रसिद्ध झाल्यावर न्या. रानडे यांच्या वाड्यात (शुक्रवार पेठेतल्या रामेश्वर मंदिरानजीक, “१, नवा शुक्रवार पेठ”मध्ये) एक मेजवानी झाली. त्याला डॉ. विश्राम रामजी घोले, रावबहाद्दूर नारायण दांडेकर, गणपतराव मानकर असे थोडेच सुधारक होते. गोपाळरावही या पंक्तीला होते. त्यांनी पुन्हा या मेजवानीचं वृत्त छापलं. ते प्रसिद्ध होताच पुण्यातल्या मध्यमवर्गीयांमध्ये आणखी खळबळ माजली. प्रकरण शंकराचार्यांकडे नेण्यात आलं. मिशनर्‍यांकडे चहापान करणार्‍या मंडळींना बहिष्कृत करावं, असा ठराव पुणेकरांनी एका सभेत केला. सुधारक मंडळींना त्यांची बाजू मांडण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली; परंतु त्याला प्रतिसाद न मिळाल्यानं मिशनर्‍यांकडे जाणार्‍या ५२ पैकी ४२ मंडळींना वाळीत टाकण्यात आलं. (दहा जणांनी दिलगिरी व्यक्त करून चहा न घेतल्याचं कळवल्यानं त्यांना वगळण्यात आलं.) त्या काळी अशा कृतीला ग्रामण्य म्हटलं जात असे. एखाद्या विशिष्ट व्यक्ती किंवा समूहानं धर्मबाह्य किंवा समाजमान्य संकेतांच्या विरुद्ध कृत्य केल्याचा आरोप करून, त्यावर सामाजिक बहिष्कार टाकणं किंवा विविध निर्बंध घालणं म्हणजे ग्रामण्य.

पुढे शंकराचार्यांनी एका पंडिताला पुण्यात पाठवून या प्रकरणाची चौकशी केली. बहिष्कृतांची कैफियत घेण्यात आली. सुधारकांतर्फे लोकमान्य टिळक व रघुनाथ दाजी नगरकर हे वकील होते, तर फिर्यादीतर्फे नारायण बापूजी कानिटकर होते. पुण्यात यावरून दोन गट निर्माण झाले. न्या. रानडे यांनी प्रायश्चित्त घेतल्याशिवाय वाळीत टाकलेल्या बेचाळीस कुटुंबांची सुटका होणार नव्हती. बहिष्कार टाकल्यानं त्याचा त्रास बायका-मुलांना होऊ लागल्यानं शेवटी न्या. रानडे यांनी वडिलांच्या आग्रहासाठी प्रायश्चित्त घेतलं. बहिष्कृतांची सुटका झाली.