सामाजिक किस्से
टांग्यांचा खडखडाट
मुख्य प्रतिमा: संग्रहातील छायाचित्र किंवा दस्तऐवज · स्रोत आणि हक्कांची ओळ इथं.
आज पुण्याच्या रस्त्यांवर वेगवान मोटारी धावत असल्या, तरी एकेकाळी या शहराची ओळख टांग्यांच्या खडखडाटानं होत असे. पेशवेकाळात सुरू झालेली आणि ब्रिटिश काळात बहरलेली ही टांगेवारी केवळ वाहतुकीचं साधन नव्हतं; तो पुण्याच्या संस्कृतीचा, शिस्तीचा आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग होता.
त्या काळात टांग्यांवरही कडक सरकारी नियंत्रण होतं. प्रत्येक टांग्याला पितळी क्रमांक असे आणि दरवर्षी शनिवारवाड्यासमोरील मैदानात घोडा व टांग्याची तपासणी केली जाई. घोडा अशक्त किंवा टांगा निकृष्ट आढळला, तर त्याला रस्त्यावर धावण्याची परवानगी मिळत नसे. आजच्या आरटीओ तपासणीचं ते तत्कालीन रूपच म्हणावं लागेल.
पुण्यात दोन प्रकारचे टांगे प्रसिद्ध होते. चार चाकी, दुमडता येणाऱ्या छताचे शाही टांगे हे अधिकारी, श्रीमंत व्यापारी आणि सरदारांसाठी; तर दुचाकी बग्गी हा सामान्य पुणेकरांचा विश्वासू साथी. रात्री प्रत्येक टांग्यावर रॉकेलचे कंदील पेटवणं बंधनकारक होतं; अन्यथा दंड अटळ असे!
टांगेवाले हे फक्त चालक नव्हते, तर शहराचे चालते-बोलते माहिती कोश होते. कोणत्या वाड्यात पाहुणे आले, कुठं लग्न, सभा किंवा मेळावा आहे, याची त्यांना बित्तंबातमी असे. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात काही देशभक्त टांगेवाले भूमिगत कार्यकर्त्यांना सुरक्षितपणे इच्छित स्थळी पोचवण्याची जबाबदारीही उचलत. त्या काळी स्त्रियांसाठी टांग्याला दोन्ही बाजूंनी जाड कापडी पडदे लावण्याची सोय असे; जेणेकरून आतली व्यक्ती बाहेरून दिसणार नाही. या सोयीचा टांगेवाले कल्पकतेनं वापर करत. अनेकदा क्रांतिकारकही वेषांतर करून टांग्यात बसत. शिवाय, पोलिसांची गस्त कुठं चालू आहे, याची नेमकी खबर असल्यानं टांगेवाल्यांच्या हातून हे देशकार्य घडताना क्वचितच चूक घडत असे.
विसाव्या शतकाच्या मध्यापासून मोटारगाड्या, बस आणि रिक्षांच्या वाढत्या वापरामुळे टांग्यांचा खडखडाट हळूहळू थांबला. मात्र, पुण्याच्या इतिहासात या टांग्यांनी केवळ प्रवासीच नाही, तर शहराच्या संस्कृतीच्या आणि शिस्तीच्या असंख्य आठवणींचेही गाडे ओढले.