सामाजिक किस्से
पुणेरीपणाचा अर्क
मुख्य प्रतिमा: संग्रहातील छायाचित्र किंवा दस्तऐवज · स्रोत आणि हक्कांची ओळ इथं.
पुणेरी स्वभाववैशिष्ट्यं, समोरच्याला शब्दांनी गारद करण्याचं कसब आणि अचाट बुद्धिमत्ता यांचा मिलाफ असणारी अनेक अवलिया व्यक्तिमत्त्वं पुण्याच्या सार्वजनिक जीवनात वावरली आहेत. या सर्वांचा अर्क होते ॲडव्होकेट प्र.बा. (प्रल्हाद बाळकृष्ण) जोग. ते केवळ एक नामांकित वकील नव्हते, तर विक्षिप्तपणाचा बादशाह होते. त्यांच्या बुद्धीची धार जेवढी तीक्ष्ण होती, तेवढीच त्यांची जीभही! त्यांचे विक्षिप्तपणाचे किस्से आजही पुण्याच्या गल्लीबोळांत ऐकायला मिळतात.
प्र.बा. जोग यांचा पुण्यातला वावर अत्यंत रुबाबदार आणि तितकाच जगावेगळा होता. रोज सकाळी पुण्याच्या रस्त्यांवरून हातात छडी घेऊन, पांढऱ्याशुभ्र वेशात त्यांचा वावर सुरू होई. वकील म्हणून त्यांचा दरारा मोठा होता. ते गरीब आणि गरजू अशिलांसाठी मोफत खटले लढायचे; पण जर समोरचा श्रीमंत किंवा गर्विष्ठ असेल, तर अवाजवी फीदेखील आकारायचे. जोगांकडे केस देण्यासाठी त्यांची एक विक्षिप्त अट असायची : “मी न्यायालयात काय बोलेन आणि कसं वागेन, यात अशिलानं मध्ये तोंड उघडायचं नाही!”
पुणेरी पाट्या ही आता जगभर पोचलेली या शहराची खासियत. जोगांना तिचा जनक म्हणायला हवं. “माझ्यावर विश्वास असेल तर या, नाही तर कायमचे कटा (गणगोतासह),” ही त्यांच्या दारावरची अशिलांचं स्वागत करणारी पाटी होती. जोडीला, ‘कटण्याचा मार्ग’ही दाखवलेला होता!
पुण्यात त्या काळी प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या वसंत व्याख्यानमालेत वक्ता म्हणून व्यासपीठ न मिळाल्यानं त्यांनी स्वतःच्या चारचाकी गाडीवर लाकडी फळी ठोकून त्या फिरत्या व्यासपीठावर ‘पसंत व्याख्यानमाला’ सुरू केली होती. नेहरू स्टेडियमवरच्या एका क्रिकेट सामन्याचं धावतं समालोचन करण्याची संधी नाकारली गेल्यावर प्रेक्षक सज्जापेक्षा उंचावर मचाण बांधून ध्वनिक्षेपकावरून त्या सामन्याचं समालोचनही त्यांनी केलं होतं!
जोगांची पुण्याच्या पालिकेतली आणि जाहीर सभांमधली वाकयुद्धं फार गाजली. आचार्य अत्रे यांच्यासारख्या दिग्गज लेखकाला आणि वक्त्यालाही आपल्या धारदार आणि उपरोधिक शब्दांनी नामोहरम करण्याचं धाडस फक्त प्र.बा. जोगांमध्ये होतं.
तत्कालीन मुंबई प्रांतात मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी दारूबंदी लागू केली, तेव्हा जोगांनी त्या निर्णयातल्या कायदेशीर त्रुटी अनोख्या मार्गानं दाखवून दिल्या. ‘दारूबंदी मोडणारा गुन्हा करा आणि माझ्याकडं या, मी तुम्हाला सोडवेन,’ अशी चक्क जाहिरात त्यांनी केली होती. त्यातून अमाप पैसा मिळाल्यावर आपल्या घराला ‘मोरारजीकृपा’ असं नावही दिलं होतं!
प्र.बा. जोग म्हणजे केवळ पुण्याच्या सामाजिक जीवनातलं वादळ नव्हतं, तर पुण्याच्या राजकीय जीवनातही ते सक्रिय होते. दोन वेळा ते नगरसेवकपदी निवडून आले होते आणि उपमहापौरपदीही स्थानापन्न झाले होते!