ऐतिहासिक किस्से
लकडी पूल
मुख्य प्रतिमा: संग्रहातील छायाचित्र किंवा दस्तऐवज · स्रोत आणि हक्कांची ओळ इथं.
पुण्याच्या मध्यवस्तीतून वाहणारी मुठा नदी या शहराची पूर्व-पश्चिम अशी विभागणी करत पुढे जाते. ही विभागणी केवळ भौगोलिक नव्हे, तर सांस्कृतिकही मानली जाते. या दोन्ही भागांना सर्वार्थानं जोडतात ते या नदीवरचे पूल आणि त्यांमध्ये सर्वांच्या तोंडी असणारं नाव म्हणजे लकडी पुलाचं (आजचा छत्रपती संभाजी महाराज पूल).
पेशवेकाळात शनिवारवाड्याची निर्मिती झाल्यानंतर मुठा नदीच्या पलीकडील भागात दळणवळण वाढवणं आवश्यक बनलं होतं. तोवरच्या पुण्याच्या नदीपलीकडच्या भागाला अलीकडच्या भागाशी जोडलं जायचं ते एकाच दगडी पुलानं. आजच्या पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालय ते कसबा पेठेतली कुंभारवेस यांना जोडणारा जो डेंगळे पूल आहे, त्याखाली या दगडी पुलाचे अवशेष आजही आढळतात. निजामशाहीत मुठा नदीवरचं धरण म्हणून तो पूल बांधलेला होता.
लकडी पूल पेशव्यांच्या काळात बांधला गेला. १७६१मध्ये पानिपतच्या युद्धानंतर श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी तो बांधला. त्या काळी नदी ओलांडण्यासाठी लाकडी फळ्या आणि ओंडक्यांचा वापर करून हा पूल तयार करण्यात आला; म्हणूनच त्याचं नाव ‘लकडी पूल’ असं पडलं.
हा पूल मुळात का बांधला, त्याचं काम फार तातडीनं का करण्यात आलं आणि त्यासाठी दगडांऐवजी लाकडाचा वापर का केला गेला, याविषयी खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही. परंतु, तोवर पेशवेकाळात विजयी मोहिमांवरूनच परतणाऱ्या मराठी फौजा ज्या दगडी पुलावरून पुण्यात परतत, त्याऐवजी पानिपतावरून परतलेल्या फौजा या लकडी पुलावरून परतल्याचे दाखले दिले जातात.
परंतु, लकडी पुलाचा इतिहास हा केवळ दळणवळणाचा नसून तो अनेक संकटांशी लढण्याचाही आहे. ऐतिहासिक नोंदीनुसार, १८४०च्या दशकात हा लाकडी पूल कोलमडला आणि ब्रिटिशांनी त्याची डागडुजी करून तो दगडी खांबांवर पुन्हा उभा केला. पुण्याच्या इतिहासातील सर्वांत काळा दिवस म्हणजे १२ जुलै १९६१ रोजी आलेला पानशेत धरणफुटीनंतरचा पूर. मुठा नदीला आलेल्या त्या प्रलयकारी पुराच्या तडाख्यात लकडी पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला होता आणि त्याचं अतोनात नुकसान झालं होतं. मात्र, पुणेकरांच्या जिद्दीप्रमाणेच हा पूल पुन्हा दिमाखात उभा राहिला.
ज्या नानासाहेब पेशव्यांच्या दूरदृष्टीतून हा पूल उभा राहिला, त्यांची समाधी या पुलाखाली, पूना हॉस्पिटलच्या समोरील बाजूला बांधण्यात आली आहे.