सांस्कृतिक किस्से

चष्मेवाले ते दिवेवाले

कालखंड: नोंद नाही सांस्कृतिक वाटचाल
अक्षर

मुख्य प्रतिमा: संग्रहातील छायाचित्र किंवा दस्तऐवज · स्रोत आणि हक्कांची ओळ इथं.

पुणेकरांच्या तिरकस, स्पष्टवक्त्या स्वभावाची वैशिष्ट्यं आणि वर्णनं अनेकदा आपल्या कानांवर पडतात. परंतु हेच पुणेकर चोखंदळ, ध्येयवेडे आणि व्रतस्थ असतात, याची उदाहरणं त्याहून कितीतरी अधिक आहेत. त्यातही, या तिन्ही गुणवैशिष्ट्यांचा संगम ज्याच्यामध्ये होता असं व्यक्तिमत्त्व म्हणजे दिनकर केळकर.

पुणे जिल्ह्यातल्या कामशेतजवळचं करंजगाव हे त्यांचं जन्मगाव. बालपण आणि शिक्षण आताच्या कर्नाटकात असणाऱ्या बेळगाव परिसरात आणि पुढे मुंबईत झालं. जुनी नाणी आणि जुनी कुलपं जमवण्याचा छंद मुंबईतल्या गिरगावातल्या चाळीत जडला. पण शिक्षण पूर्ण झाल्यावर दिनकर केळकरांनी पुण्यात चष्म्याचं दुकान सुरू केलं. अल्पावधीतच व्यवसायात एवढी प्रगती झाली, की ‘चष्मेवाले केळकर’ म्हणून त्यांची ख्याती झाली आणि दारात आलिशान बेबी ऑस्टिन गाडी उभी राहिली. मात्र, १९२०मध्ये एका सरदार घराण्याच्या वाड्यात पाहिलेलं एक जुनं लघुचित्र त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं. ती त्यांनी जमा केलेली पहिली दुर्मिळ वस्तू होती. या एका वस्तूनं केळकरांमधला संग्राहक जागा केला. पुढे जुन्या बाजारात, भंगाराच्या दुकानात फिरणं आणि पाडल्या जाणाऱ्या वाड्यांचे कलाकुसरीचे दरवाजे, खिडक्या जमा करणं हा त्यांचा ध्यास बनला.

केळकरांची चोखंदळ आणि शोधक नजर कशी होती, याचा एक रंजक किस्सा मदुराईच्या बाजारातला आहे. तिथल्या एका दुकानात त्यांना तेराव्या शतकातलं श्रीरामाचं सुबक शिर मिळालं, जे त्यांनी वजनाच्या भावानं विकत घेतलं. पुढे दुसऱ्या एका दुकानात एका मूर्तीच्या धडावर कपडे टांगलेले दिसले. केळकरांनी अचूक ओळखलं, की ते त्याच मूर्तीचं धड आहे. दोन्ही भाग त्यांनी पुण्यात आणून जोडले. चोल काळातली ती अद्वितीय मूर्ती आज संग्रहालयाचं भूषण बनलं आहे.

केळकरांनी भारतासह नेपाळ, श्रीलंका इथून अडकित्ते आणि प्राचीन दिव्यांचा प्रचंड साठा गोळा केला. ५ फुटी समईपासून ते खेळत्या दिव्यांपर्यंतचा हा संग्रह इतका अफाट होता, की ‘चष्मेवाले केळकर’ त्यामुळे ‘दिवेवाले केळकर’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

आयुष्याची तिन्हीसांज झाल्यावर हा अनमोल वस्तूंचा खजिना कुणाकडे सोपवावा, हा प्रश्न केळकरांना पडला. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक संग्रहालय पाहण्यासाठी आले असता त्यांनी ते शासनाकडे सुपूर्त करण्याची विनंती केली. आयुष्यभराची ठेव, अथांग परिश्रम आणि पोटच्या मुलासारखा जपलेला हा संग्रह त्यांनी १२ एप्रिल १९७५ रोजी एका सहीनं महाराष्ट्र सरकारला देणगी म्हणून सुपूर्त केला. सरकारनं त्यांना मानद संचालक म्हणून दरमहा ३,००० रुपये मानधन देऊ केलं; पण निरलस केळकरांनी “मला एवढे पैसे नकोत,” म्हणत केवळ ५०० रुपये स्वीकारले!