सांस्कृतिक किस्से

भरत नाट्य मंदिर

कालखंड: नोंद नाही सांस्कृतिक वाटचाल
अक्षर

मुख्य प्रतिमा: संग्रहातील छायाचित्र किंवा दस्तऐवज · स्रोत आणि हक्कांची ओळ इथं.

पुण्याच्या सांस्कृतिक इतिहासात काही वास्तू या केवळ विटा-मातीच्या इमारती नसतात, तर त्या एका सामाजिक परिवर्तनाच्या साक्षीदार ठरल्या आहेत. सदाशिव पेठेतलं भरत नाट्य मंदिर हे त्यापैकीच एक. गेल्या शतकभरात मराठी रंगभूमीतले असंख्य कलाकार, दिग्दर्शक, लेखक आणि रसिक घडवणारं हे खऱ्या अर्थानं मराठी नाट्यसंस्कृतीचं संस्कारपीठ आहे.

या प्रवासाची सुरुवात झाली ती १८९४च्या सुमाराला. त्या काळी नाटकात काम करणं हे प्रतिष्ठेचं मानलं जात नसे. अशा वातावरणात दत्तात्रय आत्माराम (दादासाहेब) फाटक व त्यांच्या काही तरुण तुर्क मित्रांनी ‘स्टुडंट्स सोशल क्लब’ या हौशी नाट्यसंस्थेची स्थापना केली. पालकांचा विरोध पत्करून या तरुणांनी नाटकाला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याचा ध्यास घेतला. या संस्थेच्या बैठका सुरुवातीला विश्रामबाग वाड्यात होत असत. काही वर्षांतच या संस्थेतले तरुण उच्चशिक्षित, वकील, शिक्षक आणि समाजातील मान्यवर झाले. त्यामुळे समाजाचा नाटकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागला. तरीही, १९२३पर्यंत सुमारे तीस वर्षं या संस्थेला जागा बदलत राहावं लागलं. अखेर रावसाहेब जोशी या कलाप्रेमी नागरिकानं जमीन दान दिल्यामुळे क्लबला स्वतःचं सभागृह बांधता आलं. १९३५मध्ये भाऊसाहेब पटवर्धन यांच्यामुळे या सभागृहाचं खुल्या नाट्यगृहात रूपांतर झालं.

‘स्टुडंट्स सोशल क्लब’च्या नावानं एव्हाना ‘सोशल क्लब’ हे लघुरूप धारण केलं होतं. स्वातंत्र्यानंतर भरतमुनींना अभिवादन म्हणून त्याचं नामकरण भरत नाट्य संशोधन मंडळ असं करण्यात आलं. ‘लग्नाची बेडी,’ ‘वाहतो ही दूर्वांची जुडी,’ ‘विच्छा माझी पुरी करा’ यासारख्या नाटकांना प्रचंड लोकप्रियता मिळवून देण्यात या रंचमंचानं मोलाचा वाटा उचलला. १९५७मध्ये पु.ल. देशपांडे यांच्या ‘तुझे आहे तुजपाशी’ या नाटकासाठी पहाटेपासून लागणाऱ्या तिकिटांच्या रांगा पुण्याच्या सांस्कृतिक इतिहासाचा भाग बनल्या.

या जागेवर १९७०मध्ये सुमारे ८५० प्रेक्षकक्षमतेचं आधुनिक नाट्यगृह उभारण्यात आलं. त्यानंतर भरत नाट्य मंदिर महाराष्ट्रातील नाट्यस्पर्धांचं प्रमुख केंद्र बनलं. पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक, राज्य नाट्यस्पर्धा, भरत करंडक, आयटी करंडक, कामगार कल्याण, संस्कृत, बालनाट्य, मूकनाट्य आणि एकपात्री अभिनय अशा असंख्य स्पर्धांमधून हजारो नवोदित कलाकारांना या मंचानं पहिली संधी दिली.

या रंगभूमीवर राजा परांजपे, राजा गोसावी, शरद तळवलकर, चित्तरंजन कोल्हटकर, भक्ती बर्वे यांच्यासह अनेक दिग्गजांनी आपला ठसा उमटवला. आजही भरत नाट्य संशोधन मंडळाचं समृद्ध नाट्यग्रंथालय संशोधकांसाठी महत्त्वाचं संदर्भकेंद्र आहे.

भरत नाट्य मंदिर हे केवळ नाटकं सादर करणारं सभागृह नाही; तर मराठी रंगभूमीला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या चळवळीचं, नव्या कलाकारांना घडवणाऱ्या परंपरेचं आणि पुण्याच्या सांस्कृतिक अस्मितेचं जिवंत प्रतीक आहे.