सांस्कृतिक किस्से

‘औट घटकेच्या राजा’चा उत्सव

कालखंड: नोंद नाही सांस्कृतिक वाटचाल
अक्षर

मुख्य प्रतिमा: संग्रहातील छायाचित्र किंवा दस्तऐवज · स्रोत आणि हक्कांची ओळ इथं.

‘औट घटकेचा राजा’ हा मराठीमधील प्रसिद्ध शब्दप्रयोग. अल्पावधीसाठी ज्याच्या हाती सत्ता किंवा अधिकार येतात, त्याला उद्देशून तो वापरला जातो. परंतु ही औट घटिका म्हणजे असते तरी केवढी? तर ८४ मिनिटांची!

वैदिक पंचांगानुसार, ६० विपलांचा एक पल, ६० पलांची एक घटिका आणि ६० घटिकांचा एक दिवस होतो. एक घटिका म्हणजे आधुनिक कालगणनेनुसार २४ मिनिटे. तर अशा साडेतीन घटिकांचा उल्लेख ‘औट घटके’साठी केला जातो.

पुण्याचा आणि या औट घटकेचा थेट संबंध. त्यामुळे पुणेकरांसाठी त्याचे महत्त्वही आगळे. इ.स. १३४७ ते १५२७ या सुमारे पावणेदोनशे-दोनशे वर्षांत दख्खनच्या प्रदेशात बहामनी सत्ता होती. याच राजवटीतील एका प्रांतात राजा श्रीयाळ आणि राणी चांगुणा यांची सत्ता होती. श्रीयाळशेठ हे अत्यंत धार्मिक वृत्तीचे, भगवान श्री शंकराचे निस्सीम भक्त होते. आपल्या राज्यात कोणाला काही कमी पडणार नाही, याची काळजी घेणारे असा त्यांचा लौकिक होता.

दुर्दैवानं, इ.स. १३९६ ते १४०७ अशी सलग बारा वर्षं त्यांच्या राज्यात दुष्काळ पडला. त्या काळात श्रीयाळशेठ यांनी आपली तिजोरी जनतेसाठी खुली करून कोणालाही अन्नधान्य कमी पडणार नाही, याची तजवीज केली. त्यामुळे खूश झालेल्या बहामनी राजानं श्रीयाळशेठ यांना काय हवं ते मागण्यास सांगितलं. तेव्हा श्रीयाळशेठ यांनी जे मागितलं होतं, ते होतं औट घटकेचे राज्य!

या औट घटकेतही श्रीयाळ राजानं बहामनी साम्राज्याची तिजोरी सर्वसामान्यांसाठी खुली केली होती आणि धान्य कोठारातून धान्याचं वाटप केलं होतं. त्या आनंदाच्या भरातच त्यांचा मृत्यू झाला होता.

या श्रीयाळशेठ यांच्या नावानं पुण्याच्या रास्ता पेठेत दरवर्षी श्रावण शुद्ध षष्ठीला, म्हणजे नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी उत्सव साजरा केला जातो. गेली सुमारे चार शतकं ही प्रथा पाळली जाते. श्रीयाळशेठ राजांची आठ फूट उंचीची भव्य मूर्ती साकारली जाते. पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि ‘श्रीयाळशेठ वाणीया, खोबऱ्याच्या गोणीया’ अशा जयघोषात हजारो भाविक दर्शनासाठी रांगा लावून त्यांचं दर्शन घेतात. केईएम रुग्णालयासमोरच्याच गल्लीत, अक्षरशः हाकेच्या अंतरावरील शिराळशेठ चौक हे या उत्सवाचं ठिकाण.