सांस्कृतिक किस्से
‘आठ आण्यात गाणे विकणारी’
मुख्य प्रतिमा: संग्रहातील छायाचित्र किंवा दस्तऐवज · स्रोत आणि हक्कांची ओळ इथं.
‘मी एखाद्या समाजाची प्रगती ही त्या समाजातल्या स्त्रियांनी साधलेल्या प्रगतीच्या मापदंडावर मोजतो,’ असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं एक प्रसिद्ध वचन आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातल्या भारतीय समाजजीवनाचा वेध घेतला, तर पुरोगामित्वाच्या या कसोटीवर तो उतरत नाही, असंच म्हणावं लागेल.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातल्या किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका हिराबाई बडोदेकर यांनी एका लेखातून मांडलेली ही व्यथा तत्कालीन पुण्यालाही या कसोटीवर उतरवत नाही. हिराबाई म्हणतात :
“१९२८पूर्वी माझी बहीण कमळाबाई हिने नाटकात स्त्रियांची कामे स्त्रियांनीच करावीत म्हणून खूप प्रयत्न केले. त्याचाच एक भाग म्हणून मी १९२८साली ‘संगीत सौभद्र’ या नाटकात पुण्यात प्रथम काम केले. विजयानंद, किर्लोस्कर (वसंत), आर्यभूषण (पूर्वीचे) व भानुविलास वगैरे थिएटरांत माझ्या संगीत ‘सौभद्र,’ ‘मानापमान’ वगैरे नाटकांप्रमाणेच गाण्यांचे, जलशाचे व मैफलीचे अनेक कार्यक्रम झाले. १९२३-२४साली गाण्याच्या, जलशाच्या कार्यक्रमांना स्त्रियांनी जाण्याची पद्धत नव्हती. स्त्रियांची बसण्याची व्यवस्था वरच्या मजल्यावर स्वतंत्र असे.
“त्या वेळी पुण्यात अशा कार्यक्रमांची मजा लुटण्याची स्त्रियांना परवानगी तर नव्हतीच व पद्धतही नव्हती. त्यामुळे सुरुवातीला जेव्हा माझे कार्यक्रम असत त्या वेळी मी माझ्या आजूबाजूच्या ओळखीच्या बायका गोळा करून माझ्या कार्यक्रमाला नेत असे. स्त्रियांच्या जलशाच्या कार्यक्रमाला खानदानी चांगल्या घराण्यातील बायकांनी जाणे हे वाईट समजले जाई. जलशाचे, मैफलीचे वा गायनाचे कार्यक्रम मोठमोठ्या श्रीमंतांकडे त्यांच्या खासगी बैठकीत, वाड्यात होत असत. तिकीट लावून असे कार्यक्रम होत नसत. तिकीट लावून असे कार्यक्रम मी सुरू केले तेव्हा माझ्यावर ‘आठ आण्यात गाणे विकणारी’ म्हणून भरपूर टीका झाली. हिने गाणे स्वस्त केले, असाही प्रचार सुरू झाला. रास्ता पेठेतल्या सार्वजनिक गणेशोत्सवात प्रथम माझा गाण्याचा जाहीर कार्यक्रम झाला. पूर्वी गणेशोत्सवात वा सार्वजनिक ठिकाणी नाट्यसंगीत व शास्त्रीय गायनाचेच कार्यक्रम होत असत; सिनेसंगीत वा भावगीतांचा तेव्हा सुळसुळाट झाला नव्हता. सुरुवातीला मला गाण्याची बिदागी तर राहोच; पण कौतुकसुद्धा मिळायचे नाही..."