सामाजिक किस्से

अण्णांच्या अनवाणी पायांनी कोरलेला कर्वे रस्ता

कालखंड: नोंद नाही क्रीडा-शैक्षणिक वाटचाल
अक्षर

मुख्य प्रतिमा: संग्रहातील छायाचित्र किंवा दस्तऐवज · स्रोत आणि हक्कांची ओळ इथं.

पुण्यातल्या ज्या कर्वे रस्त्यावरून आज वाहनं ओसंडून वाहत असतात, त्याच रस्त्यावरून, त्याला ज्यांचं नाव दिलं आहे ते महर्षि धोंडो केशव कर्वे स्वतः मात्र रोज सात-आठ किलोमीटरची पायपीट करत, हे आपणापैकी काही जणांना कदाचित माहिती नसेल... आणि त्या काळी वाहनव्यवस्था तरी कुठं होती, असा विचार मनात आला असेल तर थोडं थांबा, वाचा आणि मग निष्कर्ष काढा!

आज महानगर झालेल्या पुण्याची ओळख ठरलेल्या रस्त्यांपैकी एक म्हणजे कर्वे रस्ता. परंतु कर्वेनगर, कोथरूड परिसराचा आज जो विस्तार आपण पाहतो, तो विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झाला. त्या शतकाच्या सुरुवातीला तो तेव्हाच्या पुण्याबाहेरचा भाग होता. महर्षि कर्व्यांनी १८९९मध्ये सुरुवातीला पेरुगेटजवळ अनाथ बालिकाश्रम सुरू केला. परंतु शहरात प्लेगची साथ आल्यामुळे त्यांनी तो रावबहादूर ग.गो. गोखले यांच्या हिंगण्यातल्या बागेत हलवला. सुरुवातीच्या वर्षी तिथं सात मुली होत्या. तो परिसर अत्यंत निर्जन आणि ओसाड माळरान होतं. तिथं जाण्या-येण्यासाठी पक्का रस्ता नव्हता. लकडी पुलापासून तब्बल पायी किंवा बैलगाडीनं चिखल-मातीतून वाट काढावी लागे. एकदा गव्हर्नर आश्रम बघायला येणार म्हणून लोकल बोर्डानं वनदेवीपर्यंत रस्ता केला; पण तिथून पुढचा प्रवास चिखलातूनच करावा लागे. निर्मनुष्य वस्ती असल्यानं लोकल बोर्ड तिथं पक्का रस्ता करण्यासाठी पैसे खर्च करायला तयार नव्हतं.

शेवटी १९१९मध्ये आश्रमातल्या काही ध्येयवेड्या मंडळींनी एकत्र येऊन ‘मॅड मॅन्स क्लब’ (वेडपटांचं मंडळ) स्थापन केलं! श्री. महादेव केशव गाडगीळ (तात्या) यांच्या मार्गदर्शनाखाली दर रविवारी सकाळी शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थिनी वनदेवीच्या डोंगरावर जात. तिथून ते छोटे-मोठे दगड-धोंडे उतारावरून खाली फेकत. पुढच्या रविवारी तेच दगड आणखी खाली ढकलत. शेवटी टेकडीच्या पायथ्याशी जमा झालेले दगड बैलगाडीतून आणून रस्त्यावरच्या खड्ड्यांमध्ये भरत. कुदळ-फावड्यानं ते खड्डे दाबून, वरून माती टाकून रस्ता तयार करू पाहत.

हे कष्टाचं काम करणाऱ्या त्या लहान मुलींकडे कुठलीच पादत्राणं नसत! अनवाणी पायानं, काटे टोचत, घसरून पडत, तरीही त्या मुली अत्यंत निष्ठेनं रस्ता बनवण्याचं काम करत. त्या चिमुरड्यांचे आणि शिक्षकांचे अतोनात प्रयत्न पाहून शेवटी पुण्याच्या लोकल बोर्डाला पाझर फुटला. त्यांनी सरकारकडून ७,५०० रुपयांची मदत घेऊन पुणे ते हिंगणे हा खडीचा रस्ता पूर्ण केला. मात्र, त्यासाठी आश्रमानं दरवर्षी ३०० रुपये सरकारला देण्याची अट घातली.

परंतु, अनेक वर्षं हा कर भरल्यानंतर आणि त्यानंतरही पुन्हा रस्त्याची दुरवस्था झाल्यानंतर, १९३६-३७च्या सुमारास संस्थेनं पुन्हा एकवार कंबर कसली. शिक्षक आणि विद्यार्थिनींनी स्वतः हातात घमेली, कुदळ, फावडी घेतली आणि गांधीभवन फाट्यापर्यंतचा रस्ता श्रमदानातून दुरुस्त केला. या स्वावलंबनाची आणि कष्टाची छायाचित्रं जेव्हा वर्तमानपत्रात छापून आली, तेव्हा प्रशासनाला आपली चूक उमजली. परिणामी, लोकल बोर्डानं संस्थेला ३०० रुपयांच्या करातून मुक्त केलं आणि पुणे-हिंगणे या डांबरी रस्त्याचा जन्म झाला.

महर्षि कर्व्यांच्या संस्थेतल्या मुलींना ही शिक्षण आणि श्रमदानाची प्रेरणा खुद्द अण्णांकडूनच मिळाली होती. संस्था उभारताना इमारतीच्या बांधकामासाठी मजूर परवडत नव्हते म्हणून स्वतः डोक्यावर सिमेंटची पोती, विटा आणि इतर साहित्य वाहून नेऊन कामगारांना मदत केली होती. निधीची प्रचंड चणचण असताना देणग्या मागण्यासाठी कित्येकदा अपमानास्पद वागणूक सहन केली होती. पैशांअभावी पुण्यातून हिंगण्यातल्या शाळेपर्यंत ते रोज पायी प्रवास करत होते.

ही पायपीट त्यांना नवी नव्हती. लहानपणी सातवीच्या परीक्षेसाठी ते रत्नागिरी जिल्ह्यातल्या मुरूडमधून साताऱ्यापर्यंत दोनशे किलोमीटरचं अंतर पायी आले होते आणि परीक्षेसाठी वय भरत नसल्यानं प्रवेश नाकारल्यावर पुन्हा पायी परत गेले होते. दुसऱ्या वर्षी पुन्हा ही दुहेरी पायपीट करून त्यांनी सातवीची परीक्षा दिली होती.

कर्वे रस्त्यावरून जाताना आणि महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थेकडे पाहताना त्यामागचा हा इतिहास कृतज्ञतेनं स्मरण करावा, असाच म्हणावा!