ऐतिहासिक किस्से

शिवछत्रपतींचा आदर्श

मुख्य प्रतिमा: संग्रहातील छायाचित्र किंवा दस्तऐवज · स्रोत आणि हक्कांची ओळ इथं.

‘विद्येचं माहेरघर’ म्हणून पुण्याची ख्याती आज जगभर आहे; पण या शैक्षणिक वैभवाचा पाया पेशवेकाळात आणि त्याहीपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रचला गेला होता. महत्त्वाचं म्हणजे चार भिंतींमधली शाळा ही संकल्पना अस्तित्वात आलेली नसलेल्या त्या काळी औपचारिक शिक्षणाबरोबरच शिवछत्रपतींच्या इतिहासातून धडे घेण्याचा आग्रह पेशवे कुळातल्या नव्या पिढीकडे धरला जात असे.

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्र.ल. गावडे यांनी या संदर्भात ‘पुणे शहरातील शिक्षणसंस्था’ या लेखात घेतलेल्या आढाव्यानुसार, शिवाजी महाराजांच्या काळाच्या आसपास वैदिक शिक्षण दिलं जात असे आणि त्या सुमाराला पुण्यात वैदिक शास्त्री-पंडितांची आठ घरं होती, अशी एक नोंद सापडते. खुद्द शिवाजी महाराज बालपणी पुण्यात राहत असताना ‘लिहिणे-वाचणे शिकवण्यासाठी नेमलेल्या गुरुजींपाशी शिवबा बसे,’ असाही उल्लेख आढळतो. कोणकोणते विषय त्या वेळच्या शिक्षणात होते, याची कल्पना पुढील वर्णनावरून येते : ‘लाल महालात शिवबा श्रुती, स्मृती, महाभारत, रामायण, राजनीती, शास्त्रे, सुभाषिते यांत रमून जाई; तर कुस्ती, घोडदौड, तलवारीचे हात, भाल्याची फेक, पट्ट्याचे हात, निशाणबाजी, जोरात धावणे, दौडणे, लांब उड्या मारणे यांत तो गुंग होई.’

पेशवेकाळात ज्यानं त्यानं आपल्या ताकदीनुसार पंतोजी, शास्त्री किंवा भिक्षुक पदरी बाळगून मुलांना शिकवायचं, अशी पद्धत होती. परंतु, या औपचारिक आणि व्यावहारिक शिक्षणापलीकडे जाऊन, आपल्या पुढच्या पिढीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी आदर्श डोळ्यांसमोर ठेवावा, याविषयी पेशवे घराण्यातील ज्येष्ठ मंडळी कमालीची आग्रही होती.

ते शिक्षण अक्षरओळख करून घेण्यापुरतं मर्यादित नव्हतं. राजपुत्र नीतिमान, कार्यकुशल, व्यवहारपटू आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे देशाभिमानी व्हावा, असा त्यामागचा स्पष्ट हेतू असे. सन १७८३मध्ये सवाई माधवराव पेशवे यांच्या बालपणी त्यांना उद्देशून गोपिकाबाईंनी पाठवलेलं पत्र या भूमिकेवर लख्ख प्रकाश टाकतं. या पत्रात त्यांनी सवाई माधवरावांच्या रोजच्या अभ्यासाची दिनचर्या मांडली आहे. त्यानुसार, सकाळच्या सत्रात राजपुत्रानं कित्ता वळवावा (हस्ताक्षर सुधारावं), अंकगणित, गुणाकार, भागाकार आणि जमाखर्चाची पद्धती शिकावी; दुपारी तिरंदाजी व घोडदौड या लष्करी कला अवगत कराव्यात आणि सायंसंध्येला संस्कृत श्लोक म्हणावेत. परंतु, या संपूर्ण औपचारिक अभ्यासाचा मुख्य गाभा सांगताना गोपिकाबाई पत्रात आवर्जून लिहितात, की त्यानं (माधवरावांनी) वृद्धांच्या व शहाण्यांच्या तोंडून दिल्लीचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घ्यावा आणि आपल्या पूर्वजांची हकीकत कारभाऱ्यांकडून ऐकावी.

पेशवेकाळात प्रजेलाही मोडी वाचन, हिशेब, संसारचोपडी, भू-मापन आणि मराठ्यांच्या बखरी शिकवल्या जात. त्या काळी परीक्षा नसत, पण नोकरीसाठी सुंदर अक्षर आणि हिशेबातील पक्केपणा महत्त्वाचा मानला जाई.

औपचारिक शिक्षणाची चौकट काहीही असो; पण पुढील पिढीनं शिवछत्रपतींचा देदीप्यमान इतिहास विसरता कामा नये, हा पेशव्यांचा आग्रह पुण्याच्या शैक्षणिक संस्कृतीला अधिक प्रगल्भ आणि पराक्रमी बनवणारा ठरला, हे निःसंशयपणे म्हणता येईल.