उद्योगांच्या कथा
शेतकऱ्यांची रिअल इस्टेट कंपनी
मुख्य प्रतिमा: संग्रहातील छायाचित्र किंवा दस्तऐवज · स्रोत आणि हक्कांची ओळ इथं.
शेतकऱ्यांची मालकी, त्यांचं सभासदत्व किंवा त्यांच्याकडे समभाग असणाऱ्या सहकारी संस्था ही कल्पना आता काही नवी राहिलेली नाही. परंतु या संस्थांचा उद्देश नफा कमावणं हा नव्हे, तर ‘एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ’ हा असतो. परंतु हेच शेतकरी एखाद्या महानगरात स्वतःची चक्क कंपनी थाटत असतील, त्याद्वारे बांधकाम व्यवसायात (रिअल एस्टेट) प्रवेश करत असतील आणि त्याद्वारे पुण्याच्या नावलौकिकातही भर घालत असतील तर...?
ही गोष्ट आहे १९९०च्या दशकातली, पुण्याच्या पूर्वेकडील मगरपट्ट्यातली. १९८७चा पुण्याचा विकास आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर हे शहर सर्व दिशांनी झपाट्यानं विस्तारू लागलं होतं. शहरांभोवतीच्या शेतजमिनींवर गुंठेवारीतून बेकायदा बांधकामं वाढू लागली होती. अचानक हाती पैसे येऊ लागले होते आणि त्यांचा विनियोग क्वचितच चांगल्या रीतीनं होत होता. मगरपट्ट्यातल्या शेतकरी कुटुंबांतल्या काही विचारी तरुणांना परिस्थितीचं गांभीर्य आणि अपरिहार्यता यांचा अंदाज येऊ लागला होता. त्यांचं नेतृत्व करत होते पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शिल्पकार व माजी खासदार अण्णासाहेब मगर यांचे पुतणे सतीश मगर.
या तरुणांनी आपल्या शेतजमिनींकडे विक्रीयोग्य वस्तू म्हणून पाहण्याऐवजी कच्चा माल म्हणून पाहण्याचे पर्याय चाचपण्यास सुरुवात केली. त्यातून त्यांच्या डोळ्यांपुढे आलं गुजरातच्या आणंदमधलं शेतकऱ्यांच्या सहकारी संघाचं उदाहरण. प्लॉट काढून विकण्यापासून विचार सुरू झाला आणि तो टाउनशिपच्या संकल्पनेपाशी येऊन थबकला. १९९२-९३चा सुमार होता. टाउनशिप ही कल्पना तेव्हा प्रत्यक्षात आलेलीही नव्हती. तरीही, सतीश मगर यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन प्रस्तावित टाउनशिपचा बृहत् आराखडा तयार केला. १९९३-९४मध्ये तो राज्य सरकारला सादरही केला. त्या काळी खासगी विकसकांना टाउनशिप उभारू देण्यासाठी नियमच अस्तित्वात नव्हते.
परंतु, देशात आर्थिक उदारीकरणाचे वारे वाहत होते. त्यामुळे, लोकप्रतिनिधी वर्गातही बदल आणि नवविचारांना अनुकूलता होती. महापालिकेपासून केंद्र सरकारपर्यंत पाठपुरावा केल्यानंतर ३ डिसेंबर १९९९ हा दिवस उजाडला... मगरपट्ट्यातल्या टाउनशिपला कमाल नागरी जमीन धारणा कायद्यातून सूट मिळाली.
आता प्रत्यक्ष कार्यवाहीची दारं खुली झाली. शेतकऱ्यांची कंपनी स्थापन करायची आणि ज्याची जेवढी जमीन तेवढे समभाग (इनडिव्हिजिबल शेअर) अशा निकषावर त्यात प्रत्येकाला वाटा द्यायचा, हे ठरलं. आता प्रश्न होता, टाउनशिप उभारली तरी तिचं स्वरूप कसं असावं? त्या सुमाराला सतीश मगर हे या प्रस्तावित टाउनशिपच्या वास्तुरचनाकारांना सोबत घेऊन मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळातून अमेरिकेत सॅन होजे शहराला भेट द्यायला गेले. तिथं त्यांनी ‘वॉक टू वर्क’ ही संकल्पना प्रत्यक्षात पाहिली. तीच आपल्या टाउनशिपमध्ये अंगीकारण्याचा निर्णय त्यांनी घेतला. निवासी क्षेत्राला व्यावसायिक क्षेत्राची जोड द्यायची तर कोणत्या व्यवसायक्षेत्राची निवड करायची, हा प्रश्नही चुटकीसरशी सुटला. कारण सॅन होजेमध्ये त्यांनी माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपन्यांभोवती फुललेलं निवासी क्षेत्र पाहिलं होतं आणि भारतातही या क्षेत्राचा उदय होऊ लागला होता.
टाउनशिपच्या केंद्रस्थानी आयटी कंपन्या आणि त्यांभोवती निवासी इमारती, अशी उभारणी सुरू झाली. वित्तीय संस्थांच्या अर्थसाह्यातून एकेक इमारत उभी राहत गेली. निवासी आणि व्यावसायिक दोन्ही आस्थापनांसाठी भरघोस प्रतिसाद मिळत गेला आणि शेतकऱ्यांची एक कंपनी बांधकाम व्यवसायात भक्कम पाय रोवून उभी राहू लागली.
आज याच ‘मगरपट्टा सिटी’ची ‘नांदेड सिटी’ आणि ‘रिव्हरव्ह्यू सिटी’ ही दोन भावंडंही पुणे परिसरात उभी राहिली आहेत. ही संकल्पना साकारणाऱ्या कंपनीतला प्रत्येक समभागधारक शेतकरी नवमहानगरी रहिवासी आणि यशस्वी व्यावसायिक झाला आहे!