उद्योगांच्या कथा

औद्योगिक पुण्याचं गमक

कालखंड: नोंद नाही आर्थिक-औद्योगिक वाटचाल
अक्षर

मुख्य प्रतिमा: संग्रहातील छायाचित्र किंवा दस्तऐवज · स्रोत आणि हक्कांची ओळ इथं.

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आर्थिक-औद्योगिक आघाडीवर पुण्यानं जे परिवर्तन अनुभवलं, त्याविषयीची निरीक्षणं उद्योगमहर्षि शंतनुराव किर्लोस्कर यांनी एका लेखात नोंदवली आहेत. त्यात पुणे आणि मुंबई या महानगरांतल्या औद्योगिक संस्कृतींतला फरकही त्यांनी नोंदवला होता. ही निरीक्षणं अशी :

“पुण्याच्या स्वभावधर्मात एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवत आली आहे. पुणे हे नुसते शिक्षणाचे केंद्र आहे इतकेच नव्हे, तर शिक्षण ही एक गरज मानणे हे पुण्याचे फार मोठे वैशिष्ट्य आहे. शिक्षण ही इथल्या माणसाची, अग्रक्रम असलेली, मूलभूत गरज आहे; आणि हे इथल्या सर्व थरांत दिसते. अगदी आमच्या कामगारांतही. पुण्यातला कामगार आणि मुंबईतला कामगार यांच्यात हा ठळक फरक मला जाणवतो. पुण्यातला अगदी मोटार ड्रायव्हरही मुलीला कॉलेजमध्ये घालायचे आहे म्हणून चिठ्ठी मागायला येईल. थोडे पैसे जास्त मिळाले तर भावाच्याही मुलाला शिकवण्याची धडपड करील. पुण्यातला कुठल्याही वर्गातला माणूस हातात आलेला पैसा खर्च करताना मुलांचे शिक्षण हे सर्वांत महत्त्वाचे मानतो. त्यानंतर तो जेवणार आणि मग बँकेत थोडे पैसे ठेवणार. हे पूर्वीही असेच होते आणि आज भरपूर पैसे, चैनीच्या वस्तूंची खरेदी करण्याची ऐपत, हे आल्यावरही शिक्षणाचा अग्रक्रम बदललेला नाही.

“पुण्यात बदल ज्या काही बाबतीत झालेले दिसतात, त्यांत महत्त्वाचे म्हणजे इथल्या राहणीचा बदललेला ढाचा; इथल्या राहणीचा उंचावलेला दर्जा; अनेक क्षेत्रांत शिकणाऱ्या, पुढे येणाऱ्या मुली. आमच्या वेळी मुली कमी असत. मात्र एक दिसते, की स्त्रियांच्या दृष्टीने पुणे हे शहर नेहमीच अत्यंत सुरक्षित राहिले आहे. रात्री उशिरा एखादी स्त्री रस्त्याने एकटी जाताना दिसला तर कोणाला फार आश्चर्य वाटत नाही. पुण्याच्या दर्जेदार राहणीचे हे एक गमक म्हणता येईल.

“पुण्याचे आणखी एक गमक म्हणजे इतरत्र जिथे जिथे म्हणून कारखानदारी वाढली, तिथे तिथे राहणीत पोकळ भपका, दिखाऊपणा, सवंगपणा आला. पुण्यात मात्र तसे झाले नाही. जीवनाचा दर्जा वरचाच राहिला, त्यात सवंगपणा आला नाही.

“पुण्याच्या उत्कर्षाचे दर्शन घडवणारी आणखी एक गोष्ट सांगता येईल ती म्हणजे 'फंड' जमा करणे. पूर्वी शंभर रुपये मिळणे ही फार मोठी गोष्ट वाटे. आता लाख काय, कोटीच्या आकड्यात पैसे जमू शकतात. पुण्यात असा पैसा संकलित होऊ शकतो हे महत्त्वाचे आहे. या फंडांची गरज आणि ती भागवण्याची ऐपत, दोन्ही पुण्यात आज आहे.

“हा जो सगळा बदल आहे, तो माझ्या मते पुण्याला आलेल्या औद्योगिकीकरणाचा परिणाम आहे. इथल्या जीवनमानातला बदल, इथले सामाजिक बदल हे या एका घटनेचे परिणाम आहेत. लोकांच्या हातात पैसा खेळतो आहे. हा पैसा बाहेरून येतो; इथला माणूस तो वापरतो आणि पुन्हा तो बाहेर पाठवतो. म्हणजे संपत्ती निर्माण होणे व ती खेळती राहणे हे इथे घडते आहे. याच्यामुळे राहणीमान उंचावते आहे.”