उद्योगांच्या कथा

रिक्षाची जन्मकथा

कालखंड: नोंद नाही आर्थिक-औद्योगिक वाटचाल
अक्षर

मुख्य प्रतिमा: संग्रहातील छायाचित्र किंवा दस्तऐवज · स्रोत आणि हक्कांची ओळ इथं.

पुणे आणि रिक्षा यांचं नातं काय, या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक पुणेकराच्या दृष्टीनं वेगवेगळं असू शकतं. ‘पुण्यात जेवढ्या रिक्षा तेवढी मतं,’ असंही काहीसं अतिशयोक्तीनं आपण म्हणून शकतो. परंतु, पुण्याच्या सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा होत नाहीत, तोवर हे नातं अतूट आहे, एवढं आपण सर्व जण खात्रीनं सांगू शकतो.

या नात्याची सुरुवात झाली १९४८मध्ये. देशाला स्वातंत्र्य मिळून एक वर्ष होत होतं, तोच तत्कालीन मुंबई प्रांतात सायकल रिक्षांवर बंदी घालण्यात आली होती. त्या रिक्षा ओढणाऱ्या चालकांच्या प्रकृतीवर त्या कामामुळे विपरीत परिणाम होतो, त्यांना क्षयासारखा दुर्धर आजार जडतो, हे लक्षात घेऊन तो निर्णय घेतला गेला होता.

कोणावरील संकट हे दुसऱ्या कोणासाठी तरी संधींची दारं खुली करतं. सायकल रिक्षावरील बंदी ही प्रवासी वाहतुकीच्या पर्यायी साधनांना अशी संधी देणं होतं. उद्योजक नवलमल फिरोदिया यांनी अशी संधी चाचपून पाहण्याचं ठरवलं. सायकल रिक्षासारखं एखादं स्वयंचलित वाहन बाजारात आणलं तर सरकार त्याला परवानगी देईल काय, अशी विचारणा त्यंनी सरकारला पत्र लिहून केली.त्यावर, ‘तांत्रिकदृष्ट्या हे वाहन समाधानकारक वाटलं, तर सरकारकडून पब्लिक कन्व्हेअन्स म्हणून त्याला मान्यता मिळेल,’ असं उत्तरही आलं. यामुळे नवलभाऊंनी असं वाहन प्रत्यक्ष बनविण्याच्या हालचाली सुरू केल्या. जमनालाल बजाज यांची ‘बच्छराज ट्रेडिग कंपनी’ आणि नवलभाऊंची ‘जयहिंद इंडस्ट्रीज’ यांनी भागीदारीत हा उद्योग करण्याचा निर्णय घेतला. इटलीच्या पियाज्जिओ कंपनीबरोबर पत्रव्यवहार करून व त्यांना भेट देऊन ते बनवत असलेल्या मालवाहू तीन चाकी वाहनाचा सांगाडा आयात करण्यात आला. अशा दोन गाड्यांवर माणसं बसण्याची टांग्यासारखी सोय नवलभाऊंनी मुंबईमध्ये करून घेतली. इटलीत छोटंमोठं ओझं वाहण्याकरता निर्माण केलेल्या गाडीच्या सांगाड्याच्या साह्यानं पहिली तीन आसनी रिक्षा तयार झाली. ऑटोरिक्षा हे नवलभाऊंनीच त्याला दिलेलं नाव.

तेव्हाचे मुंबई प्रांताचे गृहमंत्री मोरारजीभाई यांच्याकडून रिक्षाला परवानगी मिळवावी लागणार होती. मोरारजींचा कडक स्वभाव नवलभाऊंना माहिती होता. म्हणून तेव्हाचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्यामार्फत मोरारजींना भेटण्याचं त्यांनी ठरवलं. योगायोगानं ते बाळासाहेबांच्या घरी गेले, तेव्हा मोरारजीभाई तिथंच होते. दोघांनाही त्यांनी रिक्षातून फेरी मारण्याची विनंती केली. रिक्षाचा तो अल्पसा, पण जलद गतीचा प्रवास दोघांनाही आवडला. त्यामुळे नवलभाऊंचा उत्साह आणखी वाढला आणि पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनाही रिक्षात बसवून फिरवून आणण्याची त्यांना इच्छा झाली. पंडितजींच्या मुंबईतल्या मुक्कामात त्यांच्या खास मर्जीतले रावसाहेब पटवर्धन यांच्या मध्यस्थीनं पंडितजींना ही रिक्षा त्यांनी दाखवली. पंडितजीसुद्धा रिक्षावर खूष झाले.

आता या ऑटोरिक्षाला अधिकृतरीत्या परवानगी मिळणं, त्याचं व्यापारी तत्त्वावर उत्पादन व वितरण करणं या औपचारिकता बाकी राहिल्या. १९४८मध्येच हे वाहन रस्त्यांवरून धावू लागलं. कालौघात पुण्याची सार्वजनिक वाहतूक हा बहुचर्चित विषय झाला. त्याचं कोडं सोडवण्यात मात्र शासनकर्त्यांना यश आलं नाही. रिक्षांची संख्या व अनिवार्यता त्यातून वाढतच राहिली. सध्या पुणे व पिंपरी-चिंचवड या महानगरांत मिळून नोंदणीकृत रिक्षांची संख्या एक लाखाहून अधिक झाली असावी, असा अंदाज आहे.