ऐतिहासिक किस्से

शनिवारवाड्याच्या आगी

मुख्य प्रतिमा: संग्रहातील छायाचित्र किंवा दस्तऐवज · स्रोत आणि हक्कांची ओळ इथं.

पुण्याच्या इतिहासात शनिवारवाडा हा केवळ पेशव्यांच्या सत्तेचं प्रतीक नाही, तर वैभव, विजय, राजकारण, कारस्थानं आणि काही दुर्दैवी घटनांचा मूक साक्षीदारही आहे. या वास्तूनं मराठा साम्राज्याचा उत्कर्ष पाहिला आणि त्याचा अस्तही अनुभवला. या सर्व घटनांमध्ये सर्वाधिक वेदनादायी ठरल्या त्या वारंवार लागलेल्या आगी. या आगींनी केवळ लाकडी इमारती जाळल्या नाहीत, तर मराठेशाहीच्या वैभवशाली वास्तुकलेचाही मोठा भाग इतिहासजमा केला.

या वैभवशाली वास्तूला १७ जून १७९१ रोजी लागलेल्या पहिल्या मोठ्या आगीत कोठी आणि सातखणी बंगल्याचे वरचे पाच मजले जळून गेले. आग आणखी पसरू नये म्हणून माजघर आणि स्वयंपाकघरासह काही भाग मुद्दाम पाडावा लागला. १८०८मध्ये पुन्हा आग लागली; मात्र त्या वेळी ती वेळेत आटोक्यात आणल्यामुळे मोठी हानी टळली.

तिसरा मोठा आघात २५–२६ फेब्रुवारी १८१२ रोजी झाला. या आगीत उरलेले दोन मजले आणि अस्मानी महाल भस्मसात झाला. त्यातून सावरत असतानाच १० सप्टेंबर १८१३ रोजी आणखी एका आगीत दिवाणखाना नष्ट झाला. प्रत्येक आगीबरोबर शनिवारवाड्याचं वैभव कमी होत गेलं आणि त्याची मूळ रचना खिळखिळी होत गेली.

येरवड्याच्या लढाईनंतर १७ नोव्हेंबर १८१८ रोजी शनिवारवाडा इंग्रजांच्या ताब्यात गेला. मात्र, शनिवारवाड्याच्या शोकांतिकेचा शेवट अजून व्हायचा होता. २१ फेब्रुवारी १८२८ रोजी लागलेली आग सर्वांत भीषण ठरली. तब्बल पंधरा दिवस धुमसणाऱ्या या आगीत शनिवारवाड्याचा जवळपास संपूर्ण उर्वरित भाग नष्ट झाला. आज उभे असलेले दगडी तट, बुरूज आणि प्रवेशद्वार त्या महाभयंकर आगीतून वाचलेल्या अवशेषांची साक्ष देतात.

दुसरे बाजीराव पेशवे यांनी स्वतःच्या निवासासाठी शुक्रवार पेठेत स्वतंत्र शुक्रवारवाडा उभारून शनिवारवाड्यातून मुक्काम हलवला होता. १८०३मध्ये ते कुटुंबासह तिथं राहायला गेले. पण दुर्दैवी योगायोग असा, की त्या वैभवशाली वास्तूचं आयुष्यही फारच अल्प ठरलं. अवघ्या सुमारे सतरा वर्षांत, १८२०मध्ये लागलेल्या भीषण आगीत शुक्रवारवाडा जळून खाक झाला. उरलेला भाग इंग्रजांनी पाडला आणि त्यातील बांधकाम साहित्यही विकून टाकलं.