सांस्कृतिक किस्से

शाहिरी नजरेतून पुणे

मुख्य प्रतिमा: संग्रहातील छायाचित्र किंवा दस्तऐवज · स्रोत आणि हक्कांची ओळ इथं.

प्रसिद्ध मराठी शाहीर राम जोशी हे मूळचे सोलापूरचे. परंतु त्यांचं पुण्याला कायम येणं असे. पेशवाईचा उत्तरकाळ त्यांनी पाहिला आणि त्याआधारे पुण्याची महती सांगणारी काव्यरचना केली. हे काव्य नेमकं कधी रचलं, याचा तपशील उपलब्ध नसला, तरी त्यातल्या वर्णनावरून पेशवाईच्या वैभवाला ओहोटी लागण्यापूर्वीचं हे लेखन असावं, असा तर्क करता येतो.

पुणे शहर अमोलिक

श्रीमंत पेशवे प्रधान बहुप्रीतीचे ॥

अष्टप्रधानांमध्ये उतरले मर्जित महाराजांचे ॥

वसविले त्यांनी पुणे शहर टूमदारीचे ॥

जागोजाग बांधले दाट नळ पाण्याचे ॥

ठायी ठायी शोभती हौद एक फर्म्याचे ॥

धनी कृपावंत प्रभू कल्याण करी रयतेचे ॥

लंकाच पुण्यामध्ये क्लेश न दारिद्र्याचे ॥

शहरात घरोघर सावकार गबर घरचे ॥

सरदार एकाहून एक श्रीमंताचे ॥

लढणार शिपाई किती सांगू मी वाचे ॥

हत्ती-घोडे-रथ-अंबारी थवे पालख्यांचे ॥

सरकार वाड्याभोवताली झुलती बहारीचे ॥

जागोजाग वस्ती भरदार गर्दी बाजार कमती नसे काही ॥

पुणे शहर अमोलिक रचना अशी दुसरी नाही ॥

१)

उत्तम पुण्याभोवती बागा ॥

शहरा हजारो स्वार घोड्यांच्या पागा ॥

भले भले धनत्तर वाडे हवेल्या जागा ॥

आळोआळी झळकती एकसारख्या रांगा ॥

वर्णिता गोड वाटते किती तरी सांगा ॥

शहरात सुखी अवघे क्वचितची भीक मागा ॥

तेही गेले कोठे धर्मास करीनारे जागा ॥

शिंद्याचा ज्यान बत्तीस फ्रेंच नालुंगा ॥

गाईकवाड सरदार येती प्रसंगा ॥

धावती रणांगणा मानक्यांच्या चुंगा ॥

शिरकेल कोणता काळकोरण्या भुंगा ॥

सहजान जिरविती सर्व त्याचा भुंगा ॥

गोखले बापू तरवार बहादर लढाईत जाई ॥

शत्रुची फौज जरजर करीतसे लवलाही ॥

२)

साक्षात विष्णू अवतार पेशवे कूळ ॥

संपूर्ण महीचे भूप कांपती धाक दरारा प्रबळ ॥

सगोपंत देवराव विठ्ठल नाना काळ ॥

शहाण्यांत साडेतीन शहाणे बुद्धीचे सबळ ॥

सेवेत सर्वदा श्रीमंतांच्या जवळ ॥

होळकर, भोसले, शिंदे मानकरी सकळ ॥

तलवार बहादर करिती शत्रूची राळ ॥

स्वारीच्या भोवती पटवर्धन मंडळ ॥

युद्धात रणांगणी जसा आगीचा लोळ ॥

बहुनामी पल्लेदार तोफांचा कल्लोळ ॥

जेजाल जंबुरे बाणकरी वळवळ ॥

सरदार सभोवती दाट पसरती तळ ॥

घोरपडे रास्ते सरदार पुरंदरे स्वार पानसे पाही ॥

फडणीस नानाची जरब भूमंडळी राही ॥

३)

पर्वतावरती पर्वती स्थान त्यावरती चौघडा ॥

तळापर्यंत पायऱ्या जावे धडधडा ॥

अनुष्ठान पंचपक्वान पडेना खाडा ॥

पुजारी पुजती उमा महेश्वर जोडा ॥

पीतवर्ण सोन्याच्या मूर्ती नव्हे या बाडा ॥

पहाऱ्यास शिपाई उभे पेटवूनी तोडा ॥

रमणाही ब्राह्मणांसाठी बांधिला केवढा ॥

श्रावणासी खर्च तो कोट्यावधी तोडा ॥

पुढे तळे त्यात लहान बेटाचा तुकडा ॥

गणपती त्यात पलिकडेस आंबिल ओढा ॥

ग्रामात तुलसीबागेत बेतही जाडा ॥

बुधवार पेठ बेलबाग नजीकचा वाडा ॥

जागोजाग मौज अनिवार नसे अंतपार वर्णं तरी काई धन्य पेशवाई ॥