सामाजिक किस्से
पुण्याचे ‘एबीसी’
मुख्य प्रतिमा: संग्रहातील छायाचित्र किंवा दस्तऐवज · स्रोत आणि हक्कांची ओळ इथं.
त्या चौकाला आजची पिढी त्याच्या इंग्रजी आद्याक्षरांनी ओळखते. परंतु त्यामुळे त्याची मूळची ओळख सर्वांपर्यंत पोचण्याचा मार्गच खंडित होईल की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
हा आहे एबीसी, म्णजेच पुण्याचा अप्पा बळवंत चौक. आजही या चौकात उभं राहून जर तुम्ही डावी-उजवीकडे नजर फिरवली, तर फक्त पुस्तकांची दुकानं, शैक्षणिक साहित्याचे ढीग आणि विद्यार्थ्यांची लगबग दिसेल.
कोण होते अप्पा बळवंत? त्यांची पार्श्वभूमी समजण्यासाठी आधी आपल्याला त्यांचे वडील बळवंतराव मेहेंदळे यांच्याविषयी जाणून घ्यावं लागेल. बळवंतराव हे पेशव्यांचे अत्यंत शूर आणि विश्वासू सरदार होते. त्यांची बहीण उमाबाई यांचा विवाह सदाशिवरावभाऊ पेशवे यांच्याशी झाला होता, तर दुसरी बहीण रखमाबाई यांचा विवाह जनार्दन फडणवीस यांच्याशी झाला, ज्यांचे सुपुत्र म्हणजेच पेशव्यांचे प्रसिद्ध कारभारी नाना फडणवीस. १७५७मध्ये कडप्पाच्या नवाबाविरुद्धची मोहीम आणि सिंदखेडच्या लढाईत बळवंतरावांनी मराठी फौजेचं यशस्वी नेतृत्व केलं होतं. १७६१च्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धात सदाशिवरावभाऊंसोबत पराक्रमाची शर्थ केल्यानंतर ते धारातीर्थी पडले होते.
त्या काळच्या प्रथेनुसार, पतीच्या मृत्यूनंतर बळवंतरावांच्या पत्नी सती गेल्या आणि जाताना आपले चिरंजीव कृष्णाजी (अप्पा) बळवंत यांना त्यांनी पेशव्यांच्या स्वाधीन केलं. हा मुलगा तेव्हा बारा वर्षांचा होता. पेशव्यांच्या घरात संगोपन झालेले अप्पा बळवंत हेदेखील वडिलांप्रमाणेच मुत्सद्दी, पराक्रमी आणि पेशव्यांचे विश्वासू कारभारी ठरले.
एका आख्यायिकेनुसार, अप्पा एकदा पेशव्यांसोबत पर्वतीला देवदर्शनासाठी जात असता अंबारी हलल्यामुळे पेशव्यांचा तोल गेला आणि अप्पांनी त्यांचा अंगरखा पकडून त्यांना सावरलं. अप्पांमुळे आपला जीव वाचला म्हणून पेशव्यांनी ती घटना ज्या ठिकाणी घडली त्या चौकाला अप्पांचं नाव दिलं. योगायोग असा, की याच चौकात सध्याच्या किबे लक्ष्मी थिएटरसमोर (पूर्वीचा प्रभात सिनेमा) मेहेंदळे सरदारांचा वाडा होता. या वाड्याचा बराचसा भाग रस्त्याच्या रुंदीकरणात हटवला गेला आहे. पूर्वी या वाड्यामध्ये एक भुयारही होतं आणि ते थेट शनिवारवाड्यात उघडे, असं म्हटलं जातं. पेशवेकाळात शनिवारवाड्याच्या सुरक्षेच्या दृष्टीनंही हा चौक अत्यंत मोक्याचा मानला जाई.
पेशवाई लयाला गेली आणि हळूहळू तत्कालीन सरदारांच्या वाड्यांच्या खुणाही पुसल्या जाऊ लागल्या. परंतु अप्पा बळवंत यांचं नाव प्रत्येक पिढीशी जोडलेलं राहिलं. विद्येचं माहेरघर ही नवी ओळख प्रस्थापित केलेल्या पुण्यातील पुस्तकं व शैक्षणिक साहित्याची बाजारपेठ म्हणून हा परिसर ओळखला जाऊ लागला.