क्रीडा किस्से

तालमींचं पुणे

कालखंड: नोंद नाही क्रीडा-शैक्षणिक वाटचाल
अक्षर

मुख्य प्रतिमा: संग्रहातील छायाचित्र किंवा दस्तऐवज · स्रोत आणि हक्कांची ओळ इथं.

पुण्याच्या मध्यवस्तीमध्ये जाऊन आजही कुठला पत्ता विचारला, तर ओळखीच्या खुणा म्हणून केले जाणारे चिंचेची तालीम, लोखंडे तालीम, नगरकर तालीम, खालकर तालीम, गोकुळ वस्ताद तालीम असे उल्लेख आपल्या कानी पडतात. विद्येचं माहेरघर म्हणून ओळख मिरवणारं पुणे हे एकेकाळी मल्लविद्येचंही माहेरघर होतं, याची साक्षीदार राहिलेली ही ठिकाणं.

पुण्यातल्या या कुस्तीच्या परंपरेला पेशवेकाळापासूनचा इतिहास आहे. त्या काळी बलोपासनेबरोबरच द्वंद्वयुद्धाचे डावपेच आणि शारीरिक चपलतेचं तंत्र अभ्यासपूर्वक आत्मसात केलं जात असावं. दोराच्या साह्यानं डोंगरकडे चढून जाणं आणि घोडेस्वारी हे नित्याचंच होतं. कुस्ती, वज्रमुष्टी (आताच्या परिभाषेत स्वैर मुष्टियुद्ध), बोथाटी, लेझीम आणि मल्लखांब हे क्रीडाप्रकार होते. घोडदौड करताना अचूक भालाफेक करणं अथवा तंबूचे खांब उचकटणं (आताच्या परिभाषेत टेंट पेगिंग), लाठीचं द्वंद्व, तलवारीचं द्वंद्व, फरीगद्गा या खेळांचा सराव केला जाई. उत्तम कुस्ती करणं फार महत्त्वाचं मानलं जात असे. त्या मानानं लिहिणं-वाचणं या दुय्यम बाबी होत्या. समाजातल्या काही ठरावीक वर्गातच पुस्तकी विद्या जोपासली जात असे.

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे स्वतः नियमित व्यायाम करायचे, तर सदाशिवरावभाऊ पेशवे दररोज हजार जोर आणि दीड हजार बैठका मारत. श्रीमंत माधवराव पेशव्यांच्या काळात नामवंत मल्लांना मासिक वेतन सुरू झालं. याच काळात दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या दरबारात तब्बल ५०-६० मल्लांचं खडं दळ होतं, ज्यांना वस्ताद राघोबा मल्लविद्येचे धडे देत.

पुढे इंग्रज राजवटीत चापेकर बंधूंनी १८९७मध्ये केलेल्या रँडच्या खुनानंतर इंग्रज सरकारनं क्रांतिकारकांचं केंद्र असल्याच्या संशयावरून पुण्याच्या तालमींची कडक झडती घेणं आणि व्यायाम साहित्य जप्त करणं सुरू केलं. त्यामुळे पुण्यात या पेशाला उतरती कळा आली.

या मरगळलेल्या तालीम पेशाला पुन्हा जिवंत करण्यासाठी १ डिसेंबर १९४७ला तत्कालीन नगराध्यक्ष बाबूराव सणस यांच्या अध्यक्षतेखाली ऐतिहासिक बैठक झाली. यात पुणे शहर तालीम संघाची स्थापना झाली. पुढे नामदेवराव मते यांच्या प्रयत्नातून १९७२मध्ये खास कुस्तीसाठी छत्रपती शिवाजी स्टेडियम उभारलं गेलं.

आज पुण्याच्या तालमींना जरी काही प्रमाणात उतरती कळा लागली असली, तरी मारुतीरायाच्या साक्षीनं बलोपासना करण्यासाठी आजही राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून तरुण-तरुणी पुण्यात येत आहेत. तालमींचं पुणे ही ओळख पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी ही उजळणी.